ठाणे - मुंबईतील मौज प्रकाशन गृहचे संपादक-प्रकाशक संजय भागवत यांचे रविवारी ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. ते ६० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी भाग्यश्री, मानसोपचारतज्ज्ञ मुलगी मनवा, मॅनेजमेंटचे शिक्षण घेणारा मुलगा अनिरुद्ध आणि मोठे भाऊ श्रीकांत असा परिवार आहे.१९९७ पासून ते २०१५ पर्यंत संजय भागवत यांनी प्रकाशक म्हणून ‘मौज’ची धुरा सांभाळली. १९९७ च्या आधी ते ‘मौज’च्या प्रिंटिंग विभागात काम करत होते. २०१५ मध्ये पक्षाघाताचा झटका आल्याने त्यांच्यावर अंधेरीमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याच रुग्णालयाच्या ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील युनिटमध्ये त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. उपचारादरम्यान रविवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.उत्कृष्ट प्रकाशकांसाठी देण्यात येणाऱ्या श्री. पु. भागवत या राज्य पुरस्काराने महाराष्ट्र शासनाने त्यांचा गौरव केला आहे. त्यांच्या पार्थिवावर मुंबईतील विलेपार्ले पूर्व येथील सहार रोडवरील पारशीवाडा स्मशानभूमीमध्ये सोमवारी सकाळी ११.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती त्यांचे थोरले बंधू श्रीकांत भागवत यांनी ‘लोकमत’ला दिली.
‘मौज’चे संजय भागवत यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2019 6:35 AM