ठाणे : औरंगाबाद-पुणे महामार्गावरील गंगापूर फाट्याजवळ झालेल्या अपघातात मरण पावलेले काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय चौपाने यांच्यावर सोमवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. चौपाने यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्याकरिता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह अनेक राजकीय नेते उपस्थित होते.औरंगाबाद येथील स्व. इंदिरा गांधी जन्मशताब्दी सोहळा आटोपून चौपाने, पूर्णेकर, म्हात्रे हे फॉर्च्युनर गाडीतून मुंबईकडे परत येत असताना रविवारी सायंकाळी हा अपघात झाला. अतिशय मनमिळाऊ, पक्षनिष्ठ आणि पक्षासाठी सदैव स्वत:ला वाहून देणारा कार्यकर्ता म्हणून चौपाने यांची ओळख होती. चौपाने यांचे वेगवेगळ्या पक्षांतील मंडळींशी सौहार्दाचे संबंध होते.ठाण्यातील बहुतेक सर्वपक्षीय मंडळींनी त्यांच्या पाचपाखाडी येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले आणि कुटुंबाचे सांत्वन केले. त्यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, भाई जगताप, चंद्रकांत हंडोरे, सचिन सावंत, राजेंद्र गावित, शहराध्यक्ष मनोज शिंदे, सुभाष कानडे, प्रदीप राव, विक्रांत चव्हाण, शिवसेनेचे खासदार राजन विचारे, डॉ. श्रीकांत शिंदे, माजी खासदार संजीव नाईक, राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, भाजपाचे आमदार संजय केळकर, सभागृह नेते नरेश म्हस्के, राष्टÑवादीचे नगरसेवक हणमंत जगदाळे, नजीब मुल्ला, अशरफ पठाण आदींचा समावेश होता. दुपारी दीडच्या सुमारास त्यांची अंत्ययात्रा वैकुंठधाम स्मशानभूमीकडे निघाली. त्यात ठाण्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाली होती.>पक्षाची मोठी हानीप्रदेश काँग्रेसचे सचिव संजय चौपाने यांच्या निधनाने सच्चा काँग्रेस कार्यकर्ता काळाच्या पडद्याआड गेला. चौपाने यांनी काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. पक्ष हेच आपले कुटुंब आहे, या भावनेने ते आयुष्यभर एकनिष्ठेने कार्य करत राहिले. त्यांच्या अपघाती मृत्यूने वैयक्तिक माझी व काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाल्याचे सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी त्यांना आदरांजली वाहिली.
संजय चौपाने अनंतात विलीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 5:43 AM