- नारायण जाधवठाणे - एमएमआरडीएने गेल्या महिन्यात गायमुख ते शिवाजी चौक, मीरा रोड या मेट्रो-१० च्या सविस्तर प्रकल्पास मान्यता दिली असून त्याचे श्रेय घेण्यासाठी विविध राजकीय पक्षांत चढाओढ लागली असली, तरी त्याच्या मार्गात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा मुख्य अडथळा राहणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. यामुळे तो पार करूनच मेट्रो-१० चा मार्ग सुकर होणार असून राष्ट्रीय उद्यानातून ही मेट्रो जाणार असल्याने तिच्या परवानगीसाठी एमएमआरडीएला केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालय, वन्यजीव संरक्षक मंडळासह राष्ट्रीय हरित लवादाच्या पायऱ्या झिजवून अडथळ्यांची शर्यत पार करावी लागणार आहे. कारण, मुंबईतील मेट्रोचा एक मार्ग आरे कॉलनीतून जाणार असल्याने त्यासाठीची परवानगी घेताना एमएमआरडीए आणि मेट्रो मंडळाची दमछाक झाली आहे.व्याघ्र संरक्षित उद्यानातून मेट्रोची वाटसंजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून या मेट्रोचा सुमारे १.२ किमी मार्ग जाणार आहे. या उद्यानातून यापूर्वीच विक्रोळी-जोगेश्वरी मार्ग, ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग जाणार आहे. शिवाय, मीरा-भार्इंदरसह मुंबई महापालिकेच्या जलवाहिन्यांसाठीही जमीन गेली आहे. यामुळे त्याचे क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत असून हे उद्यान संरक्षित व्याघ्र उद्यान आहे. याठिकाणी वाघांसह बिबटे, मुंगूस, कोल्हे, राममांजरीसह इतर पशू आणि पक्ष्यांचा अधिवास आहे. शिवाय, अनेक दुर्मीळ वृक्षवेलींनी ते सजले आहे. यामुळे मेट्रोसाठी १.२ किमी लांबीचे भुयार खोदण्यासाठी एमएमआरडीएला केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालय, वन्यजीव संरक्षक मंडळासह राष्ट्रीय हरित लवादाच्या पायºया झिजवाव्या लागणार असून प्रसंगी कोर्टाची पायरीदेखील चढावी लागणार आहे.असा उभा करणार ४४७६ कोटींचा निधीमेट्रो-१० साठी ४४७६ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून यात एमएमआरडीएचा वाटा ३५४ कोटी ७७ लाख, राज्य शासन ७७६ कोटी ७१ लाख, केंद्र सरकार ५२६ कोटी ६७ लाख असा राहणार आहे. तर, उर्वरित २७११ कोटी ८४ लाख रुपये जागतिक बँक, जायका आणि न्यू डेव्हलपमेंट बँकेकडून कर्ज घेऊन उभे करण्यात येणार आहेत.२०३१ पर्यंत असेल २१.६२ लाख प्रवासीसंख्यामेट्रो-१० मुळे मीरा-भार्इंदरसह बोरिवली, मुंबई आणि ठाणे ही तीन महानगरे जोडली जाणार असून तेथील प्रवाशांचा सध्याचा घोडबंदरमार्गे होणारा वाहतूककोंडी आणि हॉर्नच्या कर्णकर्कश आवाजाच्या प्रदूषणातून वाट काढून होणारा असह्य प्रवास सुसह्य होणार आहे. या मार्गावरून २०३१ पर्यंत २१.६२ लाख प्रवासी प्रवास करतील, असा विश्वास एमएमआरडीएने या प्रस्तावास मंजुरी देताना व्यक्त केला आहे.गायमुख ते शिवाजी चौक, मीरा रोड या मेट्रो-१० चा मार्ग 9.20 किमीचा असून या मार्गावर एकूण चार स्थानके राहणार आहेत. या मार्गाचा साडेआठ किमीचा भाग हा उन्नत, तर 0.680 किमी मार्ग भूमिगत राहणार आहे. चार स्थानके उन्नत राहणार आहे.या मार्गासाठी 2022 ची डेडलाइन आहे. याही मेट्रोचे किमान भाडे १० रुपये असून पुढील प्रत्येक टप्प्यात 10 रुपयांनी वाढणार आहे.
गायमुख-मीरा रोड मेट्रोला संजय गांधी उद्यानाचा अडथळा, १.२ किमी मार्गासाठी अडथळ्यांची शर्यत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 3:04 AM