कल्याण : तब्बल सतरा तासांच्या चौकशी अंती केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना सकाळी ८ च्या सुमारास त्यांच्या दालनामधून बाहेर काढण्यात आले. घरत यांना ठाणे येथे नेण्यात आले असून दुपारी अडीच वाजता कल्याण न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. ५२ पानांचा दस्ताऐवज पोलिसांनी तयार केला आहे. अजूनही तपासणी सुरूच आहे. रात्री त्यांच्या डोंबिवलीत मिलाप नगर येथील घरी छापा टाकण्यात आला होता..या तपासाअंती करोडो रुपयांची माया समोर येण्याची संभावना आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेतील वादग्रस्त अतिरिक्त आयुक्त संजय घरत (५१) यांच्यासह दोघा लिपिकांना बुधवारी आठ लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली होती. लाचखोरी प्रकरणात महापालिकेच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या पदावरील अधिकाऱ्याविरोधात ही कारवाई झाली आहे. सात मजली बेकायदा इमारतीवर कारवाई न करण्यासाठी घरत यांच्यासह ललित आमरे (४२) आणि भूषण पाटील (२७) या दोघा लिपिकांनी तक्रारदाराकडे ४२ लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र, तडजोडीअंती ३५ लाख देण्याचे ठरले. त्यापैकी आठ लाखांचा पहिला हप्ता बुधवारी दुपारी ३ वाजता पालिका कार्यालयात स्वीकारताना त्यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. तिघांनाही गुरुवारी कल्याण न्यायालयात हजर केले जाईल, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांनी दिली.
दरम्यान, लाचलुचपत विभागाने घरत यांच्या दोन गाड्यांची कसून झडती घेतली. त्याचबरोबर त्यांच्या निवासस्थानी छापे टाकले.राज्यमंत्र्यांशी जवळीक घरत यांची मंत्रालयापर्यंत ‘पोच’ असल्याची चर्चा नेहमी पालिका वर्तुळात रंगत असे. एका राज्यमंत्र्यांच्या ते जवळचे असल्याचे मानले जात. असे असतानाही त्यांच्यावर कारवाई झाल्याने महापालिका वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.२३ वर्षांत ३१ लाचखोर केडीएमसीच्या १९९५च्या लोकप्रतिनिधी राजवटीपासून आजपर्यंत २३ वर्षांच्या कालावधीत ३१ लाचखोर अधिकारी, कर्मचारी तर दोन आजी-माजी नगरसेवकांना लाच प्रकरणात अटक झाली आहे.