लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : खोटे गुन्हे दाखल करणे, कटकारस्थान करणे आणि खंडणी उकळणे असे आरोप असलेले राज्याचे माजी पोलिस महासंचालक संजय पांडे यांची ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाकडून बुधवारी तीन तास चौकशी करण्यात आली. याच गुन्ह्यात पांडे यांच्यासह अन्य सहा जणांना मुंबई उच्च न्यायालयाने ३ जानेवारीपर्यंत अटकेपासून संरक्षणासाठी अंतरिम जामीन दिला आहे.
पोलिसांच्या चौकशीला पांडे यांनी चांगला प्रतिसाद दिला. मात्र, आपल्यावरील आरोपांचा इन्कार करीत, हे आरोप तथ्यहीन असल्याचे त्यांनी चौकशीमध्ये पोलिसांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दोन बड्या नेत्यांच्या नावासाठी दबाव nखंडणी प्रकरणातील कथित आरोपी पांडे हे गुन्हे शाखेत आल्याची माहिती मिळाल्यानंतर तक्रारदार पुनामिया हेही या कार्यालयाच्या बाहेर दुपारी २ वाजेच्या सुमारास दाखल झाले होते. nमीरा भाईंदरच्या करोडो रुपयांच्या जमीन घाेटाळ्यात काही अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये दोन बड्या नेत्यांची नावे घ्यावीत, असा दबाव पांडे यांनी आपल्यावर आणल्याचा आरोप पुनामिया यांनी प्रसारमाध्यमांकडे केला.
अन्य सहा जणांचा आरोपींमध्ये समावेशपांडे यांच्याविरुद्ध ठाण्यातील २६ ऑगस्ट २०२४ रोजी भाईंदरचे बांधकाम व्यावसायिक संजय पुनामिया यांनी गुन्हा दाखल केला. तत्कालीन विशेष सरकारी वकील शेखर जगताप, निवृत्त सहायक पोलिस आयुक्त सरदार पाटील, गुन्हे शाखेचे तत्कालीन निरीक्षक मनोहर पाटील, श्यामसुंदर अग्रवाल, शरद अग्रवाल आणि शुभम अग्रवाल या अन्य सहा जणांचा आरोपींमध्ये समावेश आहे.
याच प्रकरणामध्ये ठाणे गुन्हे शाखेच्या वागळे इस्टेट युनिटमध्ये चौकशीसाठी पांडे यांना पाचारण केले होते. सामान्य व्यक्तीप्रमाणे एका रिक्षाने दाखल झालेल्या पांडे यांची गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक सलील भोसले यांनी चौकशी केली.