Kedar Dighe Shiv Sena: शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महाविकास आघाडी होत असलेली धुसफूस धुडकावून बंडखोर ४० आमदारांच्या साथीने भाजपासोबत महाराष्ट्रात सरकार स्थापन केले. त्यानंतर आज भाजपावर व शिंदे गटावर सातत्याने टीका करणारे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ईडीने पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी ताब्यात घेतले. त्यांना आता लवकरच अटक केली जाण्याची शक्यता आहे. पण, "मी झुकणार नाही, मी बाळासाहेब ठाकरेंचा सच्चा शिवसैनिक आहे", असे म्हणत संजय राऊत ईडी कार्यालयात दाखल झाले. या साऱ्या घडामोडी होत असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला मोठा धक्का देत धर्मवीर आनंद दिघेंच्या (Anand Dighe) पुतण्या केदार दिघे यांना पक्षातील मोठी जबाबदारी दिली.
शिंदे गटाच्या बंडानंतर शिवसेनेला मोठा धक्का बसला. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाच्या विचारावर शिंदे गट शिवसेनेशी बंडखोरी करत आहे, असे सातत्याने सांगण्यात आले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाण्याचे माजी महापौर आणि शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या राजीनाम्यानंतर, आज ठाणे जिल्हाप्रमुख म्हणून आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांची शिवसेनेकडून नियुक्ती करण्यात आली.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ठाणे जिल्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आलेल्या आहेत. अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी यादी आज जाहीर करण्यात आली. त्यात अनिता बिर्जे यांना शिवसेना उपनेते पद मिळाले. आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांची ठाणे जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांना ओवळा, माजीवाडा, कोपरी पाचपाखाडी हे त्यांचे कार्यक्षेत्र असेल असे स्पष्ट करण्यात आले. तसेच प्रदीप शिंदे यांना ठाणे शहरप्रमुख पद तर चिंतामणी कारखानीस यांना ठाण्याचे विभागीय प्रवक्तेपद देण्यात आले आहे.
शिंदे यांचे समर्थक नरेश म्हस्के यांनी जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ठाणे जिल्हा प्रमुखपदी केदार दिघे यांची नियुक्ती करण्याची खेळी शिवसेनेने खेळली अशी चर्चा उठली होती. पण अशी कोणतीही नियुक्ती करण्यात आलेली नाही असे सांगत या चर्चांना खुद्द केदार दिघे यांनीच पूर्णविराम लावला होता.