ठाणे - विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात जोरदार शाब्दिक जुगलबंदी रंगली होती. दरम्यान, उद्धव ठाकरेंवर टीका करताना देवेंद्र फडणवीस यांनी तुम्ही म्हणजे मुंबई आणि तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, असे उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हटले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना चार शब्दात सुनावले आहे. तुम्ही म्हणजे देश नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
एका कार्यक्रमानिमित्त ठाण्यात आलेल्या संजय राऊत यांना प्रसारमाध्यमांनी गाठले असता त्यांनी विविध विषयांवर आपलं मत मांडलं. दिल्लीतील पालिका निवडणुकांबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, दिल्लीच्या निवडणुका या भारतीय जनता पक्षाला सोप्या राहिलेल्या नाहीत. फक्त महापालिका निवडणुकाच नाहीत, तर लोकसभा निवडणुकासुद्धा भाजपासाठी कठीण आहेत, याची जाणीव त्यांना आहे.
यावेळी काँग्रेसच्या सद्यस्थितीबाबत विचारले असता संजय राऊत यांनी सांगितले की, काँग्रेस पक्षाला एक इतिहास आहे. सध्या त्यांच्याकडे फक्त भूगोल राहिलेला नाही. त्यांनी भूगोल वाढवला पाहिजे. उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांच्या निकाल पाहता या देशामध्ये काँग्रेसने स्वत:ची ताकद जर वाढवली तरच २०२४ मध्ये भाजपाविरोधात समर्थ पर्याय उभा राहू शकतो.
तर आज उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीबाबत माध्यमांनी विचारले असता संजय राऊत यांनी योगी आदित्यनाथ यांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, योगीजी पुन्हा एकदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनले आहेत. जनतेने त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. योगींबाबत आम्ही नेहमी प्रेम आणि आदर व्यक्त केला आहे. योगी मोठे नेते आहेत. योगींना आमच्या शुभेच्छा, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली.