ठाणे : उद्धव ठाकरे यांनी डोळ्यावर पट्टी बांधली आहे. त्यामुळ संजय राऊत त्यांना काय खरे काय खोटे सांगतात हे त्यांनाच समजत नाही. खऱ्या मालकाशी प्रामाणिक न राहता राऊत दुसऱ्याच मालकाशी अधिक प्रामाणिक असल्याचा आरोप शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे. या भंगार व्यक्तीमुळेच पक्षाचे वाटोळे झाल्याचेही ते म्हणाले.
ठाण्यात घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गद्दारी बेईमानी हा अंगार नाही तर भंगार असल्याची टीका केली होती. त्यानंतर त्यांना म्हस्के यांनी प्रत्युत्तर दिले आहे. दसरा मेळाव्यात यापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्फत हिंदुत्वाचे विचार व्यक्त केले जात होते. काँग्रेसवर टिका केली जात होती. परंतु आता उद्धव ठाकरे यांच्या दसºया मेळाव्यात हिंदुत्वाचे विचार बाजूला सारले गेले असून केवळ कॉंग्रेसला जवळ केले जात असल्याची टीकाही त्यांनी केली. त्यात ३०० रुपयांच्या खिचडीचे टेंडर राऊत यांच्या घरात जाते आणि त्यांचे कुटुंबांयाच्या खात्यात पैसे वळते केले जातात, हे भंगार नाही तर मग काय? असा सवालही त्यांनी केला.
दसरा मेळाव्यासाठी आम्ही दोन जागेंचे पर्याय पुढे आणले आहेत. त्यातील क्रॉस मैदान अंतिम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या मार्फत दसरा मेळाव्यातून बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार पुढे नेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून बाळासाहेबांच्या शिकवणीनुसार ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारणाचे विचार आम्ही पुढे नेणार आहोत, सरकारच्या माध्यमातून ज्या काही नव्या योजना आणल्या गेल्या आहेत, त्याची माहिती दिली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.