ठाणे : ‘कम्पाउंडरला डॉक्टरपेक्षा जास्त कळते’, हे खासदार संजय राऊत यांचे विधान चुकीचे आहे. आम्ही या कठीण काळात जीव धोक्यात घालून काम करीत आहोत. अशावेळी आम्हाला शासन आणि राजकीय मंडळींच्या पाठिंब्याची, सहकार्याची अपेक्षा असते. मात्र, जर तुमच्याकडूनच अशाप्रकारचे वक्तव्य होत असेल, तर आम्हा डॉक्टरांना पूर्ण कार्यक्षमतेने आणि प्रामाणिकपणे काम करता येणार नाही. अशाप्रकारचे वक्तव्य करणाऱ्या राऊत यांच्या खासदारकीचा राजीनामा घ्यावा, अशा मागणीचे निवेदन इंडियन मेडिकल असोसिएशन ठाणे शाखेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राऊत यांनी, ‘मी कधीही डॉक्टरकडून औषध घेत नाही. कम्पाउंडरकडून औषध घेतो. त्याला डॉक्टरपेक्षा जास्त कळते’, असे विधान केले होते. त्यांच्या या विधानामुळे वैद्यकीय क्षेत्रात नाराजी पसरली आहे.सध्या संपूर्ण जग कोरोनाविरोधात लढते आहे. आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर, नर्स ते अगदी सफाई कामगारांपर्यंत सर्वच जण मोठी जोखीम पत्करून काम करत आहेत. पण, अशा काळात राऊत यांच्यासारखे ज्येष्ठ राजकारणी जर असे वक्तव्य करणार असतील, तर आम्हाला त्याचा खेद वाटतो. या वक्तव्यामुळे आम्ही सर्व डॉक्टर निराश झालेलो आहोत. राऊत यांच्यावर आपण योग्य ती कारवाई करावी, अशा शब्दांत निषेध व्यक्त करून इंडियन मेडिकल असोसिएशन ठाणे शाखेचे अध्यक्ष डॉ. संतोष कदम आणि सचिव डॉ. वेदहास निमकर यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे.
संजय राऊत यांचा राजीनामा घ्यावा, मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 12:57 AM