काँग्रेस भौगोलिकदृष्ट्या विस्तारली तरच आगामी काळात भाजपला सक्षम पर्याय उभा राहील, संजय राऊत यांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 10:27 PM2022-03-25T22:27:01+5:302022-03-25T22:27:37+5:30
Sanjay Raut News: काँग्रेस केवळ कादंबरीतच आहे, असे नाही तर काँग्रेसने भौगोलिकदृष्टया विस्तारले पाहिजे. स्वत:ची ताकद वाढविली पाहिजे,तरच आगामी लोकसभा निवडणूकीमध्ये भाजपला सक्षम पर्याय उभा राहू शकतो, असे विधान जेष्ठ पत्रकार तथा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी ठाण्यातील एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात केले.
ठाणे - काँग्रेस केवळ कादंबरीतच आहे, असे नाही तर काँग्रेसने भौगोलिकदृष्टया विस्तारले पाहिजे. स्वत:ची ताकद वाढविली पाहिजे,तरच आगामी लोकसभा निवडणूकीमध्ये भाजपला सक्षम पर्याय उभा राहू शकतो, असे विधान जेष्ठ पत्रकार तथा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी ठाण्यातील एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात केले. त्याचवेळी आगामी काळात लोकसभेसह सर्वच निवडणूका या भाजपला सोप्या राहणार नाहीत, असा दावाही त्यांनी यावेळी केला.
पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या ‘प्राप्तकाल’ या कादंबरीचे प्रकाशन राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ठाण्यातील गडकरी रंगायतन नाटयगृहात पार पडले. त्याप्रसंगी पत्रकारांशी संवाद साधतांना त्यांनी हा दावा केला. ते पुढे म्हणाले की, काँग्रेसला एक मोठा इतिहास आहे. मात्र, त्यांना केवळ भूगोल राहिलेला नसून तो त्यांनी वाढविला पाहिजे. उत्तरप्रदेश किंवा इतर राज्यात निकाल पाहता काँग्रेसला या देशामध्ये स्वत:ची ताकद वाढविली पाहिजे, तरच २०२४ मध्ये काँग्रेस समर्थ पर्याय देऊ शकतो. तत्पूर्वी, प्रकाशन कार्यक्रमात झालेल्या परिसंवादामध्ये त्यांनी शाखा आरएसएस आणि शिवसेनेच्याही वाढत आहेत, असे म्हटले होते. त्यावर भाष्य करतांना ते म्हणाले, शिवसेनेची शाखा आपोआप भरते. संघासाठी माणसे तयार केली जातात. तसेच शिवसेनेच्या शाखेमार्फत समाजकार्य केले जाते. लोकांची कामेही होत आहेत, असा दावाही केला. योगी यांना उत्तरप्रदेशात नायकाचा दर्जा दिला गेला, या प्रश्नावर ते म्हणाले, योगी हे मोठे नेते असून त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत.
दिल्लीतील निवडणूका या भाजपने लांबणीवर टाकल्याचा आरोप आपने केल्याबाबत राऊत म्हणाले, संपूर्ण देशातच महापालिकेच्याच नव्हे तर सर्वच निवडणूका या भाजपला सोप्या राहिलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्यात एक भीती निर्माण झालेली आहे. या कार्यक्रमाला ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, माजी कुलगुरु तसेच कोकण मराठी साहित्य परिषदेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. भालचंद्र मुणगेकर, माध्यम सल्लागार जयू भाटकर, जेष्ठ लेखक भारत सासणे आणि वरिष्ठ निवेदक मिलिंद भागवत आदी उपस्थित होते. यावेळी प्राप्तकाल कादंबरीच्या अनुषंगाने लेखक तथा जेष्ठ पत्रकार संजीव लाटकर यांनी मान्यवरांशी संवाद साधला. पुतिनने काय केले पाहिजे हे कोकणातला माणूसच सांगू शकतो, असेही प्राप्तकालच्या अनुषंगाने रंगलेल्या परिसंवादामध्ये राऊत म्हणाले.