ठाणे : तब्बल ५६ पोलिसांना ठार मारणाऱ्या कुख्यात नक्षलवादी बरजू पिंगाठी याला अटक करणारे तर दोन नक्षलवाद्यांना ठार करणारे नक्षलवादी विभागातील लालेकसा पोलीस ठाण्याचे तत्कालीन व ठाणेनगर पोलीस ठाण्याचे विद्यमान पोलीस निरीक्षक (गुन्हे) संजय साहेबराव साबळे यांना प्रजासत्ताक दिनी विशेष सेवा पदकाने सन्मानित केले. आतापर्यंत साबळे यांनी जवळपास २०० बक्षिसे पटकावली आहेत.साबळे हे १९९२ साली महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक म्हणून भरती झाले. मूळ साताºयाचे रहिवासी असलेले साबळे यांना पहिले पोलीस ठाणे हे उल्हासनगर मिळाले. शहर पोलीस आयुक्तालयाबरोबर त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तालयातही, अनेक गुन्हे उघडकीस आणले. डिसेंबर २०१० मध्ये साबळे हे पोलीस निरीक्षक झाले. या पदावरील त्यांची पहिली नियुक्ती नक्षलवादी क्षेत्र असलेल्या लालेकसा पोलीस ठाण्यात २०११ मध्ये झाली. २०११ ते २०१४ असे नक्षलवादी क्षेत्रात कर्तव्य बजावताना,साबळे हे नक्षलवाद्यांना पकडण्यासाठी गेले असता अचानक झालेल्या गोळीबारात साबळे यांनी दोन नक्षलवाद्यांना ठार केले. त्यानंतर ५६ पोलिसांना ठार मारणाºया बरजू पिंगाठी याला पकडले. त्यानंतर त्यांनी आणखी चार नक्षलवाद्यांनाही अटक केली. बरजू याला पकडल्यावर तत्कालीन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी चक्क आनंदाच्या भरात साबळे यांना मिठी मारली.नक्षल भागातील कामगिरीबद्दल १ मे २०१६ रोजी त्यांना विशेष सेवा पदक जाहीर झाले. साबळे यांची ठाणे शहर आयुक्तालयात बदली झाली. कापूरबाबडी, मुंब्रा येथे काम करताना, १ जुलै २०१८ रोजी त्यांनी ठाणेनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) म्हणून पदभार स्वीकारला. ठाणे बाजारपेठेतील कृष्ण मंदिरातील ४० लाखांचे दागिने गोकुळाष्टमीपूर्वी चोरीला गेले. तो गुन्हा गोकुळाष्टमीच्या दिवशीच उघडकीस आणण्याची उल्लेखनीय कामगिरी त्यांनी केली.
नक्षलवाद्यांचे कर्दनकाळ संजय साबळे यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 12:33 AM