भाजपाच्या बालेकिल्ल्यात सन्नाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 12:08 AM2018-12-12T00:08:58+5:302018-12-12T00:09:31+5:30
पक्षश्रेष्ठींना होती पराभवाची चाहूल; दिग्गजांचे पक्षप्रवेश ठेवले रोखून
- अनिकेत घमंडी
डोंबिवली : धुळे, जळगाव, अहमदनगर येथील स्थानिक निवडणुकांमध्ये भाजपाला घवघवीत यश मिळाले असतानाही त्याचा जल्लोष साजरा न करता, पाच राज्यांचे निकाल येईपर्यंत संयम ठेवण्याच्या सूचना कल्याण डोंबिवलीत पक्ष कार्यकर्त्यांना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर मंगळवारी मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसने बाजी मारल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाला उधाण आले; तर भाजपच्या बालेकिल्ल्यात प्रचंड सन्नाटा पसरला होता.
भाजपाच्या कल्याण जिल्हा स्तरावरील एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, ठाणे जिल्ह्यातील अनेक दिग्गजांना भाजपमध्ये प्रवेश करायचा होता; परंतू राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सावध पवित्रा घेत मंगळवारनंतर बघू, असे संकेत दिले होते. त्यामुळे रविवारच्या विश्व हिंदू परिषदेच्या निमित्ताने भाजपात होणारे अन्य पक्षांमधील प्रवेश काही काळ पुढे ढकलण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. एक्झिट पोल्सच्या अंदाजानुसार भाजपाला यश मिळणार नाही हे स्पष्ट झाले होते. त्यामुळे दिग्गजांना प्रवेश देऊन आधीच्या कार्यकर्त्यांना नाराज करु नये, अशी भूमिका राज्यमंत्र्यांसह त्यांच्या सहकारी आमदारांनी घेतली होती. पक्षप्रवेश करुन घेताना आयात नेत्यांना आश्वासने दिल्यास जुने कार्यकर्ते नाराज होतील. परिणामी पाच राज्यांच्या निकालानंतर पक्षात फूट पडू नये, यासाठी हे पक्षप्रवेश लांबवल्याचेही सूत्रांनी सांगितले. कोणत्याही परिस्थितीत पक्ष फूटू नये, यासाठी त्यात्या ठिकाणच्या पक्षश्रेष्ठींना काळजी घेण्याचे संकेत उच्चस्तरावरुन देण्यात आले होते. पक्षामध्ये नव्यांना संधी दिली, पदे दिली, तर जुन्या कार्यकर्त्यांची नाराजी ओढावू शकते.
अशातच मतदारांनी काँग्रेसच्या बाजुने कौल दिला आणि त्यानंतर लगेचच पक्षात फूट पडली तर ती पोकळी भरुन काढताना, जुन्या कार्यकर्त्यांची नाराजी दूर करतांना नाकी नऊ येऊ शकतात, हे हेरुन प्रवेश लांबवण्यात आले. बदलापूर, मुरबाड, कल्याण, भिवंडी आदीसह विविध भागांमधील घटक पक्षांच्या मातब्बरांचे प्रतिनिधी भाजपामध्ये येण्यासाठी इच्छूक असल्याची माहितीही सूत्रांनी दिली. मात्र मंगळवारच्या निकालानंतर आता हे प्रवेश पुन्हा कधी करायचे, हे सध्यातरी गुलदस्त्यात ठेवण्यात आहे. शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्र्रेस आणि मनसेमधीलही काही पदाधिकारी भाजपाच्या म्हणजेच आमदार व राज्यमंत्र्यांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
काँग्रेसच्या विजयानंतर सोशल मीडियावर अंधभक्तांना उद्देशून अनेक संदेशांचा पाऊस पडला. भाजपाने केलेल्या मनमानी कारभाराचे वाभाडेही काढण्यात आले. त्यावर भक्तांनी काहीही बोलणे टाळले; पण विरोधकांनी ती संधीही न सोडता ‘इतना सन्नाटा क्यो है भाई’ असे म्हणत भक्तांवर शाब्दिक झोड घेतली. बालेकिल्ल्यातील भाजप कार्यकर्त्यांनी मात्र यावेळी मौन बाळगल्याचे निदर्शनास आले.
२५ डिसेंबर रोजी दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती आहे. त्यादरम्यान काहींना प्रवेश दिला जाऊ शकतो. मात्र मंगळवारी पराभव चाखल्यानंतर इतर पक्षांमधील पदाधिकाºयांना पक्षात घेण्याचा निर्णय घ्यायचा की नाराज कार्यकर्त्यांनाच उभारी देऊन पक्षामध्ये एकजूट कायम ठेवायची, हा मोठा पेच कल्याण, ठाणे जिल्ह्यातील पक्षश्रेष्ठींसमोर आहे. त्यामुळे कुणाला पक्षप्रवेश देण्यापेक्षा कमकुवत कार्यकर्त्यांना वेळीच समज द्यावी आणि अन्य राज्यांतील पराभवाची जखम भरल्यानंतर आत्मविश्वास वाढवण्यासाठी, पक्ष स्थानिक पातळीवर बळकट करण्यासाठी सध्या थांबवलेले प्रवेश सोहळे आटोपून घ्यायचे, अशी रणनीती ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली.