ठाणे : कासारवडवली येथे राहणारे संतोष कपारे यांनी २०२२ साली केोला स्वत:चा जागतिक विक्रम मोडीत काढत यंदा नवा विक्रम रचला. त्यांनी १६ तासांत तब्बल १५३ गाणी सादर केली. त्यांच्या या विक्रमाची इंटरनॅशनल एक्सलन्स ॲवॉर्डमध्ये नोंद घेण्यात आली आहे. ‘सदाबहार मोहाम्मद रफी’ हा कार्यक्रम सादर करीत मोहम्मद रफी यांची एकाहून एक सरस गाणी सादर केली. या १५३ गाण्यांमध्ये ११० एकल आणि ४३ युगल गाणी सादर केली.
अंतरा म्यूझिक अँड एन्टरटेनमेंटद्वारे सिवास्वामी फाइन आर्टस ऑड़ीटोरीयम येथे आयोजित जागातिक गाण्य़ांचा विक्रम करणारा कपारे यांचा "सदाबहार मोहाम्मद रफी" हा कार्यक्रम पार पडला. कपारे यांनी या कार्यक्रमात मोहम्मद रफी यांची सलग १६ तासांत १५३ गाणी गाऊन एक जागतिक विक्रम रचला आहे. मनिषा निश्चल, रूची चुडीवाले , रिम्मी भूतानी , रेनू खन्ना, ममता गौडसरा, जयेश पनारा (राजकोट), सीमा चक्रवर्थी आणी राजेंद्र काले यांनी त्यांना युगल गीत गाण्यात साथ दिली. शिवाजी बनसोडे, प्रवीण हीरे, विशाल माळी, मायकल पिटर, प्रविण फाटक, संतोष भोसले या सर्व वादकांनी साथ दिली. या कार्यक्रमाला परिक्षक म्हणून संदीप सिंग उपस्थित होते.
हा कार्यक्रम पहाटे ७:३० वाजता सुरू झाला तो रात्री ११:३० वाजता संपला. कपारे यांनी "शोधिसी मानवा" या गाण्याने कार्यक्रमाची सुरूवात तर शेवट "नैन मिलाकर चैन चुराना" या गाण्याने केली. एक गाणे सुरू करुन संपवायला कपारे यांना सहा मिनिटे लागली होती. विशेष म्हणजे कपारे यांनी पहिल्या गाण्यापासून ते शेवटच्या गाण्यांपर्यंत तीच ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी केवळ चहा आणि पाण्याचे सेवन केले. २० डिसेंबर २०२२ रोजी , ठाण्याच्या काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात रफी यांची १२४ गाणी गाऊन कपारे यांची भारत बूक ऑफ वर्ल्ड रेकोर्ड मध्ये नोंद झाली होती. यावेळी त्यांनी ७५ एकल आणि ४९ युगल गाणी सादर केली होती.