ठाणे - शासकीय मनोरुग्णालयाच्या अखत्यारीत असलेल्या जागेत आयपीएच संस्थेने पुढाकार घेऊन ‘सप्तसोपान’ पुन्हा नव्याने सुरू केले आहे. मंगळवार 10 ऑक्टोबर रोजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत तसेच, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या विशेष सदिच्छा भेटीने या परिसराचे औपचारीक उदघाटन होणार आहे.
‘सप्तसोपान’ हा मनस्वास्थ्य पुनर्वसन परिसर रु ग्णालयापासून थोडय़ा अंतरावर आहे. धर्मवीर नगरमध्ये, गणोशमंदिरालगतचा हा परिसर द्रुतगती मार्गापासून तीन-चारशे मीटर दूर असला तरी अतिशय शांत आणि दाट वनराईचा आहे. यंदाच्या जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहाच्या निमित्ताने आयपीएच या संस्थेतर्फे अनेक वैशिष्टय़पूर्ण कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे. यातील बहुसंख्य कार्यक्रम या परिसरातून सादर केले जात आहेत. महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग आणि आय. पी. एच. संस्था यामधील परस्पर सामंजस्य करारानुसार या परिसराचा विकास केला असून आय. पी. एच. संस्था बहुविध पुनर्वसन आणि प्रशिक्षण सेवा सुरु करीत आहे. 1 ऑक्टोबर पासूनच हा परिसर अनेक उपक्र मांनी गजबजून गेला आहे. व्यसनाधीन व्यक्तींच्या पत्नींच्या सहचरी या आधारगटासाठीचे सहकारी कृतीकेंद्र या परिसरात पुढच्या तीन महिन्यांमध्ये सुरु होत आहे. तसेच व्यसनमुक्तीच्या वाटेवर असलेल्या कुटुंबातील 6 ते 16 या वयोगटातील मुलांसाठी ‘अंकुर’ हा विकासगट नियमतिपणो सुरु होत आहे. शनिवार 7 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4 ते 7 या वेळेत ओसीडी अर्थात मंत्रचळेपणा या आजाराने ग्रस्त रुग्ण आणि नातेवाईकांसाठी परफेक्ट ग्रुप या मासिक आधारगटाचा शुभारंभ होत आहे. त्यानिमित्ताने एक खास परिसंवादही होणार आहे. या परिसंवादात ज्येष्ठ मनोविकास तज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी, मनोविकार तज्ज्ञ डॉ. श्रीकांत जोशी व मानस तज्ज्ञ कवितागौरी जोशी सहभागी होणार आहेत. 5 व 6 ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषदेच्या उपक्रमशील शिक्षकांसाठी पूर्ण दिवसाच्या कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. ‘सप्तसोपान’ परिसरातील हे सर्व उपक्रम संपूर्णपणे नि:शुल्क आहेत.