ठाणे : दरोडे, खंडणी आणि खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये दोन वर्षांपासून फरार असलेल्या मुंब्रा येथील एका सराईत गुन्हेगारास ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने शनिवारी बेड्या ठोकल्या. त्याला मुंब्रा पोलिसांच्या हवाली केले आहे.कौसा-मुंब्रा येथील अमृतनगरमध्ये राहणारा मोहम्मद नदीम अजीज मर्चंट ऊर्फ नदीम चिकना याच्याविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात खून, दरोडे, खुनाचा प्रयत्न, विनयभंग आणि हाणामारीसारखे १५ गंभीर गुन्हे दाखल आहेत. २००६ पासून तो गुन्हेगारी कारवायांमध्ये गुंतलेला आहे. त्याच्याविरुद्धचे बहुतेक गुन्हे सध्या न्यायप्रविष्ट आहेत. पोलिसांनी वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करूनही नदीम चिकना वठणीवर आला नाही. वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग आढळून आला आहे. खुनाचा प्रयत्न केल्याचे दोन आणि खंडणीच्या एका गुन्ह्यामध्ये मुंब्रा पोलीस गेल्या दोन वर्षांपासून नदीमच्या शोधात होते. हा अट्टल फरार आरोपी मुंब्रा बायपासवरील खडी मशीन रोडवर येणार असल्याची माहिती खंडणीविरोधी पथकास शनिवारी मिळाली. त्यानुसार, सहायक पोलीस आयुक्त एन.टी. कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा, पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे, पोलीस निरीक्षक विकास घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथकाने सापळा रचून नदीमला बेड्या ठोकल्या. त्याच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांच्या तपासासाठी त्याला मुंब्रा पोलिसांच्या हवाली केल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांनी दिली. आरोपीजवळून गावठी बनावटीचे पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली.>आरोपीच्या तोंडात चार ब्लेडनदीम चिकना हा सराईत गुन्हेगार आहे. त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांवर ब्लेडने हल्ला चढवणे, गॅस सिलिंडर पेटवून आग लावण्याचा प्रयत्न करणे असे प्रकार तो नेहमी करतो. पोलिसांनी शनिवारी नदीमला अटक करण्याचा प्रयत्न केला असता, तेव्हादेखील त्याने गडबड करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला शिताफीने अटक केली. झडती घेतली असता त्याने तोंडात चार ब्लेड लपवून ठेवलेले दिसले.
सराईत गुन्हेगार नदीम चिकना गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 4:16 AM