मीरा रोड : मीरा रोडमधील रुग्णालयासाठी आरक्षित भूखंडावर रुग्णालय बांधण्यासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात १८० कोटी रुपयांची तरतूद करावी, असे साकडे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना घातले आहे.
महापालिका हद्दीतील आरक्षण क्र. ३०२ हा भूखंड रुग्णालयासाठी आरक्षित आहे. १३ हजार चौरसमीटर क्षेत्राचा हा भूखंड पालिकेने टीडीआर देऊन ताब्यात घ्यावा अशी मागणी जून २०२० पासून आयुक्तांकडे केली आहे. या रुग्णालयासाठी आरक्षित भूखंडावर अद्ययावत रुग्णालय, तसेच डॉक्टरांच्या निवासाची व्यवस्था व परिचारिका यांच्या प्रशिक्षण केंद्राची उभारणी होऊ शकते असे सरनाईक यांचे म्हणणे आहे. अर्थसंकल्पामध्ये रुग्णालयासाठी १८० कोटींची तरतूद करावी अशी विनंती केली आहे. रुग्णालय बांधण्यासाठी किमान तीन ते चार वर्षे लागणार असून, ही रक्कम सरकारकडून टप्प्याटप्प्याने महापालिकेला द्यावी, जेणेकरून रुग्णालयाची उभारणी होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रुग्णालय उभारण्याच्या मागणीत लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्याचे ते म्हणाले.
कोरोनाच्या काळात शहरामध्ये रुग्णालयांची संख्या अपुरी पडून अनेक रुग्णांचे हाल झाले. काही खासगी रुग्णालयांनी मोठ्या रकमेची बिले आकारली व नागरिकांची लूट केली. वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने भाईंदरमधील पंडित भीमसेन जोशी रुग्णालय, तर मीरा रोडमधील भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालय अपुरे पडत आहे. त्यामुळे नवीन सुसज्ज सरकारी रुग्णालय उभारण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सरनाईक म्हणाले.