कल्याण: कल्याण पश्चिम गोदरेज हिल येथील ‘विराजमान’ या बंगल्यात वास्तव्य करीत असलेले बांधकाम व्यावसायिक योगेश देशमुख यांना कोरोना झाला असतानाही ईडीचे पथक मंगळवारी सकाळी त्यांच्या निवासस्थानात घुसले व देशमुख यांना आपल्यासोबत जबाब देण्याकरिता येण्यासाठी जबरदस्ती करीत होते. शिवसेना आ. प्रताप सरनाईक यांच्यासोबत आमचा जमीन व्यवहार झाला नसतानाही तो झाला आहे व त्याकरिता सरनाईक यांनी मनी लॉड्रिंगमधून पैसे उभे केले, असा जबाब देण्याकरिता देशमुख यांच्यावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप त्यांच्या पत्नी शीतल देशमुख यांनी केला.
टिटवाळा नजीक गुरुवली येथील जमीन व्यवहार प्रकरणी चौकशी करण्याकरिता ईडीची टीम कल्याण पश्चिमेतील देशमुख यांच्या बंगल्यात पोहोचली. देशमुख यांना कोरोना झाला असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले आहे. असे असतानाही ईडीच्या टीमने देशमुख यांच्या बंगल्यात प्रवेश केला. ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत शीतल देशमुख यांचा वाद झाला. सरनाईक यांच्यासोबत आमचा जमिनीचा व्यवहार झालेला नाही. तरीही गेले काही दिवस ईडीचे अधिकारी आम्हाला नाहक त्रास देऊन घाणेरडे राजकारण करीत आहेत, असे शीतल यांचे म्हणणे आहे. सरनाईक यांनी गुरुवली येथे ७८ एकर जमीन खरेदी केली असून ईडीने ती जप्त केली असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता.
मंगळवारी सकाळी ७.४५ वाजता ईडीच्या अधिकाऱ्यांचे चौकशी पथक कल्याणमध्ये देशमुख यांच्या बंगल्यावर पोहोचले. या पथकात दहा अधिकारी होते. त्यापैकी केवळ एक महिला अधिकारी होती. शीतल म्हणाल्या की, माझे पती योगेश यांना कोरोना झाल्यामुळे आमच्या बंगल्याचा परिसर सील करण्यात आला आहे. पतीला जबाब देण्याकरिता मुंबईला नेण्याकरिता जबरदस्ती करू नका, असे सांगूनदेखील ईडीचे अधिकारी ऐकत नव्हते. कोरोना नियमावली ईडीच्या अधिकाऱ्यांना लागू नाही का, ईडीला त्या नियमावलीचे उल्लंघन करण्याचा परवाना दिला आहे का, असे सवाल शीतल यांनी केले. सरनाईक यांच्यासोबत आमचा जमिनीचा व्यवहार आर्थिक कारणास्तव रद्द झाला. यासंदर्भात आमची केस सुरू आहे. हे ईडीला सांगूनही सररनाईक यांनी ही जागा घेतली आहे. त्यांनी जमीन खरेदीकरिता पैसा मनी लॉड्रिंगमधून उभा केला असा जवाब देण्याकरिता ईडी योगेश यांच्यावर दबाव टाकत असल्याचा दावा शीतल यांनी केला.
घाणेरडे राजकारण सुरू असल्याचा आरोप ईडीला सरनाईक यांच्या विरोधात भक्कम दावा दाखल करायचा असेल पण त्याकरिता घाणेरडे राजकारण सुरू आहे. या राजकारणात आम्ही, शेतकरी आणि मध्यस्थ भरडले जात आहोत. त्याचा आम्हाला प्रचंड त्रास होत आहे, असे शीतल म्हणाल्या. शीतल देशमुख यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांवर केलेल्या गंभीर आरोपांबाबत ईडीचे म्हणणे समजू शकले नाही.