भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या निर्देशानुसार दहिसर चेकनाका परिसरात नियोजित नाट्यगृहाच्या निश्चित मुदतीतील बांधकाम पूर्णत्वावरच महापौर डिंपल मेहता यांनी शंका उपस्थित करून त्यांनी त्याची बांधकाम परवानगीच रद्द करण्याचा प्रस्ताव ८ डिसेंबरच्या महासभेत आणण्याची तयारी केली आहे. त्यावर आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपाच्या कुरघोडीच्या राजकारणाला ब्रेक लावण्याची तक्रार थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करत नियोजित नाट्यगृह पूर्णत्वास जाण्याचे साकडेही घातले आहे.२०११ मध्ये दहिसर चेक नाका परिसरात असलेल्या डी. बी. रिअॅल्टी या विकासाच्या गृहप्रकल्पाला पालिकेने बांधकाम परवानगी दिली. त्यापोटी पालिकेला मिळालेल्या आरजी (रिक्रिएशन ग्राऊंड) वर नाट्यगृह बांधण्यात यावे, अशी मागणी सरनाईक यांनी पालिकेकडे केली आहे. परंतु, ही जागा बिल्डरच्याच घशात घालण्याचे कटकारस्थान काही भ्रष्ट अधिकाºयांकडून सुरु झाल्याने ती पुन्हा आंदोलनाच्या माध्यमातून पालिकेकडे आणण्यास सरनाईक यांना यश आले. विकासकाने बांधलेल्या गृहप्रकल्पासाठी या जागेचा टीडीआर वापरण्यात आल्याने त्याच्या मोबदल्यात विकासकाने स्वखर्चातून नाट्यगृह बांधण्याचे पालिकेकडून निश्चित केले. परंतु, विकासाकडून सतत विलंब होऊ लागल्याने अखेर १७ नोव्हेंबरच्या पाहणी दौºयात सरनाईक यांनी विकासकाला नाट्यगृहाच्या बांधकामाला त्वरित सुरूवात करण्याचे निर्देश दिले. पालिकेनेही विकासकाला बांधकाम परवानगी देत बांधकाम पूर्णत्वासाठी डिसेंबर २०१८ पर्यंतचे अल्टीमेटम दिले. त्याचे काम सुरु झाल्यानंतर महापौर मेहता यांनी नाट्यगृहाच्या पूर्णत्वावरच संशय व्यक्त करून त्याची बांधकाम परवानगीच रद्द करण्याचा प्रस्ताव महासभेत आणण्याची तयारी केली आहे.अनेक वर्षांच्या विलंबानंतरही विकासकाकडून डिसेंबर २०१८ पर्यंत नाट्यगृहाचे बांधकाम पूर्ण होणार नाही. त्यामुळे ती जागा पालिकेच्या ताब्यात दिल्यास त्याचे बांधकाम पालिकेकडून केले जाईल. विकासाच्या दिरंगाईला चाप लावण्यासाठीच बांधकाम परवानगीवर टाच आणण्याचा दावा करण्यात आला आहे. त्याची कुणकूण सरनाईक यांना लागताच त्यांनी टीका केली.काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेनेही महापौरांच्या नाट्यगृह परवानगी रद्द करण्याच्या मनसुब्यावर टीका करत सेनेच्या कारभारावरही आसूड ओढले आहे. संघटनेचे मीरा-भार्इंदर शहर (जिल्हा) उपाध्यक्ष मनोज राणे यांनी पालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांना दिलेल्या पत्रात नाट्यगृहाच्या बांधकामाची परवानगी रद्द न करता ते पूर्णत्वास न्यावे, अशी मागणी केली आहे.मोठ्या विलंबानंतर नाट्यगृहाचे बांधकाम सुरु झाले असताना सत्ताधारी भाजपा व विरोधी बाकावरील शिवसेना यांच्यातील राजकीय कुरघोडीमुळे नागरिक विकासाला मुकत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. एकमेकांच्या कुरघोडीत भाजपाने बहुमताच्या जोरावर नाट्यगृहाची परवानगी रद्द केल्यास स्वाभिमानीकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
नाट्यगृह पूर्ण होण्यासाठी सरनाईक यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 12:53 AM