ठाणे : शेठ ग्रुपच्या वाहनतळामध्ये कोविड सेंटर उभे राहत आहे. त्यावर भाजप गटनेते संजय वाघुले यांनी आक्षेप घेणे गरजेचे होते. मात्र वाघुले अथवा किरीट सोमय्या यांनी तसे केले नाही. कॅडबरी येथील शेठ ग्रुपच्या कार्यालयात वाघुले यांची त्यांच्या सल्लागाराबरोबर मिटिंग झाल्याचे सीसीटीव्ही फूटेज आपल्याकडे आले असल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केला. या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी त्यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रारीद्वारे केली.एका ‘प्रतापी’ आमदाराच्या हट्टामुळे व्होल्टास येथील कोविड सेंटरचे काम चालू असल्याचा आरोप वाघुले यांनी बुधवारी केला होता. त्याचा समाचार सरनाईक यांनी घेतला. व्होल्टास आणि शेठ ग्रुपच्या वाहनतळामध्ये उभी राहत असलेली दोन्ही कोविड सेंटर माझ्या मतदारसंघातच येत असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले. परंतु वाघुले यांनी फक्त व्होल्टास कंपनीच्या जागेवर होत असलेल्या कोविड सेंटरबद्दल आक्षेप घेतला असून, त्यामध्ये त्यांना भ्रष्टाचाराचा वास येत आहे. व्होल्टास येथील सेंटरचा खर्च १३ कोटी आणि शेठ ग्रुपच्या वाहनतळामधील सेंटरचा खर्च २३ कोटींचा आहे. महापालिकेच्या स्थायी समितीने व महासभेत या दोन्ही कोविड सेंटरना मंजुरी मिळालेली आहे, याकडे सरनाईक यांनी लक्ष वेधले. दरम्यान, ठाण्यात सेना-भाजपमध्ये चांगलेच राजकारण तापू लागले आहे. वाघुले यांची खोपट येथील हायवेनजीक असलेल्या देवकार्पोरा इमारतीमधील शेठ ग्रुपच्या कोविड सेंटरच्या कार्यालयात सल्लागारांसोबत बैठक झाल्याचे सीसीटीव्ही फूटेज आपल्याकडे असल्याचा दावाही त्यांनी केला. त्यामुळे केवळ व्होल्टास येथील कोविड सेंटरबद्दल आक्षेप घेण्यामागे भ्रष्टाचार तर नाही ना, अशी शंका सरनाईक यांनी बोलून दाखवली. या प्रकरणी सोमय्या व वाघुले या दोघांची चौकशी करावी, अशी विनंती त्यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला केली आहे.
कोविड सेंटरवरून सरनाईक यांचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 12:24 AM