ठाणे : ७ फेब्रुवारी, २०२४ रोजी मानपाडा, ठाणे येथील पेट क्लिनिक मध्ये श्वानाला केलेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थात गुरूवारी आ. प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांसह वेटिक पेट क्लिनिक, मानपाडा येथे पाहणी करून क्लिनिकच्या मालकावर व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
७ फेब्रुवारी रोजी श्वानाचे मालक वरूण शेठ मानपाडा येथे राहत असून ते लग्नाला जाणार असल्यामुळे त्यांनी वेटिक पेट क्लिनिक, मानपाडा येथे असलेल्या सुविधेनुसार दोन दिवसांकरिता ते श्वान वेटिक पेट क्लिनिकमध्ये देखभालीकरिता ठेवले होते. परंतू, क्लिनिकमधील कर्मचार्यांने श्वानाला लाथा-बुक्यांनी मारहाण केली व त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला. त्यामुळे प्राणीमित्र संघटनेने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला. त्याची दखल मुख्यमंत्री व शासकिय अधिकाऱ्यांनी घेतली असून झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आज सरनाईक गेले असता त्या क्लिनिकच्या मालकावर व कर्मचाऱ्यावर एफ.आय.आर. दाखल करून चितळसर-मानपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक निलेश गाडे व ठाणे महानगरपालिकेच्या पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. क्षमा शिरोडकर यांना कारवाई करण्यास सांगितले.
पाहणी केली असता असे निर्दशनास आले की, वेटिक पेट क्लिनिकच्या मालकाकडे प्राण्यांना दिल्या जाणाऱ्या पशुखाद्याचा परवाना नसल्यामुळे महानगरपालिकेने परवाना रद्द करण्याची नोटिस काढलेली आहे. झालेल्या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलीस आयुक्त यांच्याशी मोबाईल फोनवर संपर्क साधून यासंबंधात चर्चा केली असता पोलीस आयुक्त यांनी पोलीस निरिक्षक निलेश गाडे यांना क्लिनिकच्या मालकावर व कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.