विक्रमगड : कुंर्झे येथील जमिनीवर मेंढ्या आणि शेळीच्या कत्तलखान्याच्या परवानगीसाठी ग्रामसभेत मांडलेल्या ठरावास सरपंचांनी विरोध केल्याने संतापलेल्या उपसरपंच आणि त्याच्या साथीदाराने पिस्तूलचा धाक दाखवून सरपंचांची गाडी रस्त्यात अडवली. तसेच लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून दोन अंगठया, गळ्यातील चेन व ८० हजार रोख लुटल्याची तक्रार कुंर्झे ग्रामपंचायतीचे सरपंच नितिन मेथवाले यांनी विक्रमगड ठाण्यात केली.मुंबई येथील शेठ (नाव माहित नाही) कुंर्झे येथे घेतलेल्या जमिनीवर मेंढ्या व शेळीचा कत्तलखाना सुरू करायचा आहे. त्यासाठी ग्रामसभेचा ठराव आवश्यकही आहे. तसा ठराव १५ एप्रिलच्या ग्रामसभेत मांडला असता सरपंच नितीन गणपत मेथवाले यांनी त्याला विरोध केला़ त्यामुळे उपसरपंच प्रविण (बंटी) आरज आणि सरपंच मेथवाले यांच्यात वाद झाला़ या वादाची तक्रार करण्यास सरपंच विक्रमगड पोलीस ठाण्यात येत असतांना उपसरपंच प्रविण आरज यांसह अविनाश रघुनाथ शेलार, प्रमोद दत्तू ठाकरे, कल्पेश अंकुष शेलार, कुणाल सदानंद मेथवाले रा़ सर्व कुंर्झे आरजपाडा यांनी सरपंच मेथवाले यांना पिस्तुलाचा धाक दाखवला आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून, दोन सोन्याच्या अंगठ्या, गळ्यातील चेन व ८० हजार रूपये रोख असा ऐवज लुटून शिवीगाळ व दमदाटी केल्याची तक्रार सरपंच नितिन मेथवाले यांनी विक्रमगड पोलीस ठाण्यात केली. उपसरपंच प्रविण (बंटी) आरज व त्यांच्या चार साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरिक्षक सुनिल नंदवाळकर करीत आहे़. (वार्ताहर)
उपसरपंचाकडून सरपंचास पिस्तूलच्या धाकाने मारहाण
By admin | Published: April 20, 2015 10:46 PM