भिवंडी : ग्रामपंचायत अथवा अन्य पदांच्या निवडणुका होईपर्यंत उमेदवार हा पक्षाचा असतो. मात्र, सरपंच अथवा अन्य पदांवर निवडून आल्यावर तो संपूर्ण गाव किंवा संबंधित क्षेत्राचा होतो. जो हे मनात ठेवून काम करेल, तोच सरपंच आपल्या कार्यात यशस्वी होतो. त्यासाठी पक्षनिरपेक्ष काम करा, असे आवाहन खासदार कपिल पाटील यांनी शनिवारी केले. भिवंडी पंचायत समितीच्या वतीने सरपंच, उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला.
गावाच्या विकासाकरिता पंचायत समिती ही मुख्य दुवा आहे. सरपंच, उपसरपंच यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून विकासकामे मार्गी लावली पाहिजेत. त्यासाठी आमदार, खासदार यांच्यापर्यंत विकास निधीसाठी गेले पाहिजे. निधी देणारा आपल्या पक्षाचा आहे की नाही, याचा विचार करणे चुकीचे आहे. युतीच्या काळात तालुक्यातील ग्रामीण भागात काँक्रीट रस्त्यांचे जाळे जसे बनविले गेले, तसेच उर्वरित ग्रामपंचायत क्षेत्रातील रस्ते बनविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे ते म्हणाले.
सरपंच हा गावाचा असल्याने त्याने हलक्या कानाचे न राहता, प्रत्येक गोष्टीची शहानिशा करावी. त्यासाठी किमान सरपंच, उपसरपंच पदांसाठी ग्रामीण भागात लागलेली स्पर्धा थांबली पाहिजे, असे शिवसेना तालुकाप्रमुख विश्वास थळे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंचायत समिती सभापती ललिता पाटील यांनी केले, तर आभार भाजप गटनेते भानुदास पाटील यांनी केले. या कार्यक्रमास ४८ सरपंच, उपसरपंच उपस्थित होते. आमदार शांताराम मोरे, भाजप तालुकाप्रमुख प्रकाश म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य जयवंत पाटील, देवेश पाटील, सपना भोईर, रविना जाधव, भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र भोईर, सरपंच राजेंद्र मढवी, राम भोईर, गुरुनाथ जाधव आदी उपस्थित होते.
===Photopath===
130321\20210313_123836.jpg
===Caption===
सरपंच पद हे कोणत्या पक्षाचे नसून गावचे आहे त्यासाठी पक्षनिरपेक्ष काम करा - खासदार कपिल पाटील