आसनगाव : भ्रष्टाचाराचा आरोप, उपसरपंच निवडणुकीत निकाल न सांगताच तेथून निघून जाणे, यामुळे ज्या महिला सरपंचाविरोधात गावात रोषाची भावना आहे, त्यांना झेंडा फडकावू देण्यास खातिवली ग्रामपंचायतीने मनाई केल्याने पेच उभा राहिला आहे. गावातील वातावरणही सध्या तापले आहे. शहापूर तालुक्यातील मौजे खातिवली येथे किरण रवींद्र भोईर या आदिवासी महिला सरपंच आहेत. त्यांनी पदाचा गैरवापर करून पंचायतीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. उपसरपंचपदाच्या निवडणुकीवेळी कोणताही निर्णय न देता त्या सभेतून निघून गेल्या. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी पंचायत कार्यालयाला टाळे ठोकले. या प्रकारामुळे त्यांच्याविषयी ग्रामस्थांत प्रचंड नाराजी असल्याने शेकडो ग्रामस्थांनी प्रजासत्ताकदिनी त्यांना झेंडावंदन करू देऊ नये, अशी भूमिका घेतली आहे. ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या सह्यांचे तसे लेखी निवेदन शहापूरचे तहसीलदार अविनाश कोष्टी तसेच गटविकास अधिकारी कुलकर्णी यांना दिले आहे. त्यांनी झेंडावंदन केले तर मोठे वाद होण्याची शक्यता निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. आता अधिकारी काय निर्णय देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही वर्षांपूर्वी तालुक्यातील कळगाव ग्रामपंचायतीमधील आदिवासी महिला सरपंचाबाबतीत असाच प्रकार घडला होता. त्या वेळी विरोध करणाऱ्या ग्रामस्थांवर सरपंचाच्या तक्र ारीवरून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले होते. (वार्ताहर)
सरपंचांना झेंडा फडकवण्यास मनाई?
By admin | Published: January 25, 2016 1:22 AM