बदलापूर : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करणे योग्य की अयोग्य या चर्चेत आम्हाला जायचे नाही. आपल्याकडे न्याय व्हायला दीर्घ काळ लागतो. आरोपी सुटतात आणि पुन्हा गुन्हे करतात. त्यापेक्षा आरोपीला झटपट शिक्षा मिळाली हेच आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे गैरकृत्य केले तर पोलिस एन्काउंटर करतील, अशी दहशत अक्षय शिंदेसारखे वर्तन करणाऱ्यांना बसली पाहिजे, अशी भावना बदलापूरमधील सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केली.
अक्षयच्या एन्काउंटरवरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्याचवेळी बदलापूरमध्ये जल्लोष आणि पेढेवाटप सुरू आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांशी संपर्क साधला असता त्यांनी पोलिसांच्या कृत्याचे समर्थन केले. अक्षयने केले ते कृत्य करण्यास पुन्हा कुणी धजावता कामा नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
बदलापूर रेल्वे स्थानकात पेढेवाटप
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांचा पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मृत्यू झाल्यानंतर बदलापुरात जल्लोष करण्यात आला. मंगळवारी सकाळी बदलापूर रेल्वे स्थानकात राजकीय नेत्यांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला.