ठाणे : सीबीएसई बोर्डाचा दहावी इयत्तेचा निकाल बुधवारी दुपारी आॅनलाइन जाहीर झाला. ठाण्यातील अनेक शाळांचा निकाला १०० टक्के लागला असून डीएव्ही पब्लिक स्कूलच्या सात्त्विका व्यवहारे हिला ९९ टक्के गुण मिळाले आहे.सोमवारी सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाल्यावर दहावीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. बुधवारी निकाल आॅनलाइन जाहीर झाला. ठाण्यातील न्यू होरायझन स्कॉलर स्कूलच्या १९८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. ते सर्व उत्तीर्ण झाले असून मौलिक पालीवाल हा ९८.६ गुणांसह शाळेत अव्वल ठरला आहे. तर, शाळेतील ३५ विद्यार्थ्यांनी ९५ टक्क्यांहून अधिक, ५८ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक आणि ५१ विद्यार्थ्यांनी ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत.अरुणोदय स्कूलच्या ११४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. या शाळेचा निकालही १०० टक्के लागला असून ९८.६ टक्के गुणांसह प्रथम सोनावणे शाळेतून प्रथम आला आहे. तसेच आॅर्किड इंटरनॅशनल स्कूलचाही निकाल १०० टक्के लागला आहे. एरव्ही, निकालानंतर शाळांमध्ये गर्दी किंवा गुणवंत विद्यार्थी, पालकांचा उत्साह दिसतो. मात्र, यंदा कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्याने शाळेच्या आवारात शांतता होती.श्री माँ विद्यालयाच्या दहावीच्या पहिल्याच बॅचने यंदा सीबीएसई बोर्डाची परीक्षा दिली. विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला असून सर्व २२१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शाळेचा टॉपर ९६.४५ टक्के असून ३१ विद्यार्थ्यांना ९0 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत.
मला सर्वात चांगले गुण मिळवायचे होते. त्यादृष्टीने मी अभ्यासही करत होते. मेहनतीचे चीज झाले, मी चांगले यश मिळवू शकले.- सात्त्विका व्यवहारे, टॉपर, डीएव्ही पब्लिक स्कूल, ठाणेशाळेत प्रथम येण्याची इच्छा होती आणि अपेक्षाही होती. कारण, मी तसा अभ्यास केला होता. दहावीचा अभ्यास मी कोणत्याही कोचिंग क्लासशिवाय, घरीच केला. त्यामुळे मिळालेल्या गुणांचा आनंद अधिक आहे. - प्रथम सोनवणे,टॉपर, अरुणोदय स्कूल, ठाणे