कल्याण : पंडित सत्यदेव दुबे यांच्यासोबत मी सहा नाटकांत काम केले. त्यातून मला बरेच काही शिकायला मिळाले. नाटकातील दुर्बोधता, शब्दोच्चार, त्यातील स्पष्टता, अचूकता व शब्द उच्चारताना आपोआपच पडणारा दाब या गोष्टी मी दुबे यांच्याकडून शिकलो, असे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी अजित भगत यांनी येथे केले.
‘चार मित्र’ संस्थेतर्फे बुधवारी सायंकाळी पंडित सत्यदेव दुबे स्मृतिदिनाचे आयोजन आचार्य अत्रे रंगमंदिरात करण्यात आले होते. यावेळी माजी महापौर राजेंद्र देवळेकर व शिवसेना गटनेते दशरथ घाडीगावकर यांच्या हस्ते भगत यांना सत्यस्मृती पुरस्काराने गौरविण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे किरण खांडगे, माणिक शिंदे हे उपस्थित होते. युवा रंगकर्मी ललित प्रभाकर यांनाही सत्य स्मृती पुरस्कार देण्यात आला. प्रभाकर यांचा पुरस्कार त्यांच्या मातोश्री हेमलता भदाणे यांनी स्वीकारला. यावेळी भगत यांची मुलाखत अभिजित झुंजारराव यांनी घेतली. भगत म्हणाले की, ‘मी कल्याणमध्ये राहत असलो तरी नाटकानिमित्त मी अॅनटॉप हिल येथे मित्रासोबत होतो. आविष्कार नाट्य संस्थेने रोहिणी व जयदेव हटंगडी यांचे २१ दिवसांचे नाट्य शिबिर भरविले होते. त्यात मी सहभागी झालो होतो. तिथून माझी नाटकाची सफर सुरू झाली होती. छबिलदास शाळेत सत्यदेव दुबे यांच्या ‘संसार’ नाटकाची तालीम सुरू होती. त्यावेळी मी त्यांना भेटलो. नाटकात काम करण्यासाठी त्यांनी मागे हात धरून १०० फेऱ्या मार व त्या मी मारतो की नाही, हे पाहण्यासाठी नाटकातील कलाकार आशा दंडवते यांना लक्ष ठेवण्यास सांगितले. दुबे हे नाट्यकलेच्या कडक शिस्तीचे मास्तर होते. तिथून त्यांच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. अनेक वेळा त्यांनी मला गाठले आणि ‘कितने भागोंगे’ असा सवाल केला. त्यानंतर, मी दुबे यांच्यासोबत सहा नाटकांत काम केले. मी मुरूड-जंजिºयाचा असल्याने माझे शब्दोच्चार स्पष्ट नव्हते. क्रियापदे न उच्चारताच वाक्ये बोलण्याची सवय काही अंशी होती. तेव्हा एका नाटकात दुबे यांनी मला लहानशी भूमिका दिली. त्यात एक वाक्य होते, ‘वहिनी माणसं आपापल्या व्यवसायाला लागली की दुरावतात.’ या वाक्यातील व्यवसाय हा शब्द नीट उच्चारला जात नसल्याने त्यावर तीन महिने खर्च करणारे दुबे यांच्या कामाची अचूकता व भाषेविषयीचे प्रेम दिसून येते. त्यावेळी मी दुबे यांना तुम्ही तर बाहेरगावचे. तुम्ही इतकी चांगली मराठी कशी काय बोलता, असा सवाल केला होता. त्यावर त्यांनी तुमच्यापेक्षा जास्त बाहेरवालेच मराठी शुद्ध व चांगली बोलतात, असे ठामपणे सांगितले होते आणि ते खरेही होते. हे मला त्यांच्या नाटकातील शब्दोच्चाराच्या आग्रहावरून पटले होते.’ते पुढे म्हणाले, ‘शाहीर मधू कडू यांची नाटके करीत होतो. त्यांच्या तालमी सकाळी ६ वाजता ठेवायचो. कडू यांच्यामुळे लोककला व तमाशाचे सर्व प्रकार मला चांगल्याप्रकारे कळण्यास मदत झाली. ‘संयुक्त दशावतार’ नाटक करण्यासाठी गोव्यापर्यंत फिरलो. दशावतार किती पद्धतीने केला जातो, त्याच्या पार्ट्या किती आहेत, हे जाणून घेण्यासाठी त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. तेव्हा कुठे ‘संयुक्त दशावतार’ केले.’
‘ज्येष्ठ दिवंगत नाटककार व कलाकार गिरीश कर्नाड लिखित ‘तलेबंद’ या नाटकाचा प्रयोग मी बसविला होता. सुरुवातीला त्यांनी हे नाटक करणे आव्हानात्मक आहे, असे मला सांगितले. मात्र, त्यांचे भाऊ संगीत व गायन शिकले होते. त्यांची मदत घेतली. तेव्हा गिरणी कामगार असलेले २२ कलाकार त्यात घेऊन नाटक उभे केले. त्यावेळी कर्नाड यांनी त्यांच्या नाट्यसंहितेच्या रॉयल्टीपोटी असलेले १० हजार रुपये नाटकाच्या प्रयोगासाठी देऊ केले. तीन प्रयोगांत पैसा संपला. मग, त्यांच्या भावाने पुढील पैसे दिले. सहा प्रयोग त्या नाटकाचे झाले. हे आव्हान मी तेव्हा पेलले. त्याचे कर्नाड यांनी कौतुक केले होते, असे ते पुढे म्हणाले.‘उमगलेले गांधी’चे अभिवाचनयावेळी पहिल्या सत्रात ‘उमगलेले गांधी’ अभिवाचन करण्यात आले. चंद्रकांत कुलकर्णी, सुहिता थत्ते, सुनील जोशी, धनश्री करमरकर आणि दीपक राजाध्यक्ष यांनी गांधींच्या संदर्भातील विविध लेखांचे वाचन केले. त्याला रसिक प्रेक्षकांची चांगली दाद मिळाली.