आसनगाव : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी शहापूर तालुक्यातील जमिनी देणा-या शेतक-यांच्या खरेदीखताची सेंच्युरी झाली आहे. संपूर्ण जिल्ह्यात या तालुक्यातील प्रतिहेक्टरी दर सर्वाधिक असून तो कोटींच्या घरात आहे. खरेदीखताचा हा आकडा आणखी वाढावा, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी जयसिंग वळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.दिवाळीच्या पार्श्वभूमीवर उपजिल्हाधिकारी जयसिंग वळवी, प्रांत डॉ. संतोष थिटे, तहसीलदार रवींद्र बाविस्कर आदी महसूल अधिकाºयांची पाच पथके, गावोगावी जाऊन शेतकºयांशी वाटाघाटी करून प्रत्यक्ष किती मोबदला मिळणार, याची माहिती देणार आहेत. याद्वारे सर्व समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.समृद्धी महामार्गासाठी शहापूर तालुक्यातील २८ गावांतील २४ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील जमीन जात असून त्यापैकी ४ गावांत वनजमीन आहे. त्यामुळे २४ गावांपैकी २३ गावे आणि ग्रामपंचायतींनी म्हणजेच तालुक्यातील ९९ टक्के ग्रा.पं.नी संमती दिली आहे. ज्या ठिकाणी शेतकरी विरोधात असतील, त्यांचाही विरोध लवकरच मावळेल.विशेष म्हणजे समृद्धीमध्ये ज्यांची घरे, झाडे जाणार असतील, त्याचेही मूल्यांकन करून अडीच पटीने मोबदला दिला जाणार आहे. सध्या जिरायत आणि बिनशेती यांचे दर कोटींच्या घरात असून तालुक्यात काही गावांत सर्वाधिक प्रतिहेक्टरी दर जिरायत जमिनीसाठी १ कोटी ८२ लाख, तर बिनशेतीचा दर प्रतिहेक्टरी ४ कोटी ६४ लाखापर्यंत मिळणार आहे.आतापर्यंत हिव, शेरे, खुटाडी, कासगाव, वाशाळा, लाहे, रातांधळे, अंदाड, गोलभन, शेलवली, दळखण, बिरवाडी, सरळांबे, अबर्जे अशा १४ गावांतील १०० शेतकºयांनी ५१ हेक्टर जमीन समृद्धीसाठी दिली असून दिवाळीपूर्वी ५० टक्के काम पूर्ण होईल, असा विश्वास तहसीलदार रवींद्र बाविस्कर यांनी व्यक्त केला.
समृद्धी महामार्गामुळे शेतकरी झाले कोट्यधीश, शहापूर तालुक्यातील शेतक-यांच्या खरेदीखताची सेंच्युरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2017 1:38 AM