ठाणे : शेतकरी, कामगार व श्रमिक वर्गाचे देशभर तीव्र होत असलेले प्रश्न केंद्रस्थानी आणण्यासाठी संयुक्त किसान मोर्चा व केंद्रीय कामगार कर्मचारी संघटनांच्या वतीने २६ ,२७ व २८ नोव्हेंबर रोजी ठाणेजिल्हाधिकारी कार्यालये व तहसील कार्यालयांवर तीन दिवसीय मुक्काम सत्याग्रह, निदर्शने, मोर्चे आयोजित करण्यात येणार आहे. हे आंदोलन संविधान दिनी २६ नोव्हेंबरपासून सुरू होऊन महात्मा फुले स्मृतिदिनी २८ नोव्हेंबरला व्यापक प्रमाणावर करण्यात येईल.
संयुक्त किसान मोर्चा व कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली हे तीन दिवशीय मुक्काम सत्यागृह करण्यात येत आहे. श्रमिकांच्या मागण्यांसाठी राज्यभर कार्यकर्ते या सत्यागृहाव्दारे रस्त्यावर उतरणार आहे. राज्यातील दुष्काळ, जमीन, जमीन अधिग्रहण, पुनर्वसन, दूध व शेतीमालाचे भाव, पाणी वाटप, रेशन, महागाई, बेरोजगारी, शिक्षण, कंत्राटीकरण, किमान वेतन, कामगार कपात, आरोग्य, पर्यावरण यासारखे प्रश्न गंभीर झाल्याचा आराेप करून त्याविराेधात हे सत्यागृह आंदाेलन छेडण्यात येत आहे. या आंदाेलनात संयुक्त किसान मोर्चासह प्रमुख १३ शेतकरी संघटना व कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या ११ कामगार कर्मचारी संघटनां या सत्यागृह आंदाेलनात सहभागी आहेत.