सातारा : गेली चार वर्षे नाट्य संमेलनाच्या संयोजनासाठी ‘फिल्डिंग’ लावणाऱ्या सातारकरांची संधी यंदाही हुकल्याने रंगकर्मींमध्ये नाराजीचा सूर आहे. हा सोहळा आता ठाण्याला होणार असल्याने प्रसिद्ध रंगकर्मींना भेटण्याची सातारकरांची इच्छा अपूर्णच राहणार आहे.रत्नागिरीला २०११ मध्ये नाट्य संमेलन झाले, तेव्हा पुढील वर्षी आयोजकपद मिळण्यासाठी नाट्य परिषदेच्या सातारा शाखेने प्रथम पत्र दिले होते. परंतु दुसऱ्याच वर्षी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवशी १२/१२/१२ ही शतकात एकदाच येणारी तारीख येत असल्याने त्यावर्षी संमेलनाचा मान बारामतीकरांना मिळाला.त्यानंतरही सातारा, सांगली आणि नागपूर शाखांनी आयोजकपदाचा आग्रह कायम ठेवला होता. २०१३ मध्ये नागपूर आणि सातारा शाखेत आयोजनासाठी प्रचंड स्पर्धा असताना या दोन्ही शाखांना डावलून पंढरपूरचे नाव अचानक पुढे आले. त्याच ठिकाणी सीमाभागातील मराठी नाट्यरसिकांचा प्रश्न चर्चिला गेला आणि २०१४ साठी बेळगावचे नाव निश्चित झाले. त्यामुळे किमान यंदा तरी हा मान सातारकरांना मिळावा अशी अनेकांची इच्छा होती. ती पूर्ण होऊ शकत नसल्याचे सोमवारी सायंकाळी स्पष्ट झाल्यानंतर रंगकर्मींच्या वर्तुळात प्रचंड नाराजी पसरली. (प्रतिनिधी)आता भविष्याबद्दल साशंकता--गेली चार वर्षे स्वत:च यजमानपदाची मागणी करणाऱ्या सातारा शाखेने यंदा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर निधी जमविणे अवघड असल्याचे कारण सांगून स्वत:च नकार दिला आहे. त्यामुळे आगामी काळात यजमानपदाची मागणी केल्यावर नाट्य परिषदेची मध्यवर्ती शाखा ती किती गांभीर्याने घेईल, याबद्दल साशंकता असल्याचे नाट्यवर्तुळात बोलले जात आहे.
नाट्य संमेलन ठाण्याला गेल्याने सातारकरांचा ‘मेकअप’ उडाला!
By admin | Published: November 23, 2015 10:50 PM