ठाणे : श्रावणातही मध्येच कडकडीत ऊन पडत असल्याने आणि सतत बदलत्या हवामानामुळे वेगवेगळ््या साथींनी डोके वर काढले आहे. स्वाइनपाठोपाठ ठिकठिकाणी डेंग्यू आणि मलेरियाचे रूग्णही वाढत आहेत. त्याचबरोबर व्हायरल फिव्हरच्या रूग्णांनीही दवाखाने ओसंडून वाहात आहेत.स्वाइन फ्लूमुळे आणखी तीन जणांचा मृत्यू झाला असून त्याची लागण झालेल्यांची संख्या ७०० वर पोचली आहे. गेल्या चार महिन्यात ठाणे जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर स्वाइनने ३४ जणांना मृत्यू झाला. स्वाइनचे रूग्ण वाढत असतानाच वेगवेगळ््या साथींनीही डोके वर काढले आहे. डेंग्यूचे १९, मलेरियाचे २०, गॅस्ट्रोचे १६ आणि अतिसाराचे १० रुग्ण आढळले आहेत. स्वाइन फ्लूमुळे ठाणे जिल्ह्यात पहिला रुग्ण मार्चमध्ये दगावला, एप्रिल महिन्यात दुसरा, मे महिन्यात जरी ठाणे जिल्ह्यातील दोन रुग्णांचा जिल्ह्याबाहेर मृत्यू झाला. जून महिन्यात जिल्ह्यात १२ आणि जिल्ह्याबाहेर एक असे १३ जण दगावले. जुलैत आतापर्यंत १७ जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे. या सर्व मृतांतील २० जण ठाण्यात, पाच कल्याण-डोंबिवलीत, चार मीरा-भार्इंदरमधील तर दोघे नवी मुंबईतील आहेत. यातील २० महिला तर तीन लहान मुले आहे. स्वाइन फ्लूची लागण झालेल्या ७०० जणांपैकी ५०८ रुग्ण हे ठाणे आणि केडीएमसी हद्दीतील आहेत. आतापर्यंत एक लाख ४३ हजार १३९ जणांनी फ्लू संदर्भात तपासणी केली.फ्लूची तपासणी केलेल्या रुग्णांपैकी ६८३ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे. यातील ४३४ जण उपचार घेऊन घरी परतले आहेत. २१८ जण उपचार घेत आहेत. यात ठाणे आणि कल्याणला प्रत्येकी ९७ , नवी मुंबईत २१, मीरा-भार्इंदरला तीन बाधीत रुग्णांचा समावेश आहे. उल्हासनगर आणि भिवंडीत एकही रुग्ण उपचारासाठी दाखल नसल्याचे आरोग्य विभागाची आकडेवारी सांगते.पावसानंतर पडलेल्या उन्हामुळे, उबदार वातावरण तयार झाल्याने सर्वत्र डासांचे प्रमाण वाढते आहे. अनेक पालिकांत कचरा वेळेत उचलला जात नसल्याने दुर्गंधी, अस्वच्छता वाढते आहे, त्याचाही परिणाम साथी वाढण्यावर होतो आहे. त्यामुळे डेंग्यू-मलेरियाच्या रूग्णांच्या संख्येत वाढ होते आहे. यातील बहुसंख्या रूग्ण खाजगी रूग्णालयात आहेत. याखेरीज सर्दी-खोकला, व्हायरल तापाचे रूग्णही वाढले आहेत. यावेळी खोकल्याचे रूग्ण सलग दोन ते तीन आठवडे उपचारासाठी येत असल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवले.अशुद्ध पाण्याचा फटका : पावसामुळे खराब पाण्याचा फटका बसून गॅस्ट्रो, अतिसाराचे रूग्ण वाढत आहेत. त्यांचे प्रमाण सर्वत्र वाढते आहे. गढूळ पाणी, त्याचे पुरेसे शुद्धीकरण न होणे आणि पिण्याच्या पाण्यात अशुद्ध पाणी मिसळल्याने या साथींचे प्रमाण वाढू लागले आहे.मुलांतील साथी अधिकमुलांना ताप येत असेल तर त्याला शाळेत पाठवू नका, असे सांगण्यात डॉक्टरांनी सुरूवात केली आहे. हा ताप साधा असला तरीही काळजी म्हणून मुलांना विश्रांती घेऊ द्यावी, तसेच इतर मुलांत साथ पसरू नये यासाठी हा उपाय डॉक्टरांनी सुचवला आहे. लहान मुलांत सर्दी, खोकला, मुदतीचा ताप, अंग दुखीचे प्रमाण अधिक आहे.
स्वाइनपाठोपाठ धोका डेंग्यू, मलेरियाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 2:00 AM