उल्हासनगर - भाजप व शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी गोलमैदान येथील खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन ४ एप्रिलच्या स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेची माहिती दिली. मात्र छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांच्या विषयीच्या अपशब्दा बाबत निषेध अथवा गौरव यात्रा का काढली नाही. असा प्रश्न पत्रकारांनी करताच त्यांनी चुपकी साधल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-३, गोलमैदान येथील खासदार श्रीकांत शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयात आमदार कुमार आयलानी, भाजप शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, शिवसेना शिंदे गटाचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी आदींनी शनिवारी दुपारी १२ वाजता पत्रकार परिषदेत घेतली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्या विषयी काढलेल्या अपमानकारक शब्दाचा निषेध करून, ४ एप्रिल रोजी कॅम्प नं-५ ते कॅम्प नं-१ पर्यंत स्वातंत्रवीर सावरकर गौरव यात्रा काढणार असल्याची माहिती भाजप शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी दिली. गौरव यात्रेत नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचें पुरस्वानी म्हणाले. यावेळी भाजपचे माजी शहराध्यक्ष लाल पंजाबी, शिवसेनेचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी मार्गदर्शन केले.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्रवीर सावरकर यांच्या बाबत काढलेल्या अपशब्दाच्या निषेधार्थ भाजप व शिवसेना एकत्र येऊन संपूर्ण राज्यात गौरव यात्रेचे आयोजन केले. मात्र राज्याचे माजी राज्यपाल कोशारी व सत्तेतील काही नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या बाबत अपशब्द काढल्यावर, या घटनेचा भाजप व शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी निषेध अथवा अश्या यात्रा का काढल्या नाही. असा प्रश्न उपस्थित पत्रकारांनी आमदार कुमार आयलानी, शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, शिवसेना महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांना केला. मात्र त्यांनी याबाबत चुपकी साधली. तर भाजपचे माजी नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांनी याबाबत उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र इतरांनी पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला. तसेच गौरव यात्रा यशस्वी होणार असल्याची माहिती आमदार कुमार आयलानी यांनी दिली.