- मुरलीधर भवारकल्याण : स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सावरकर स्मारकातर्फे राज्यात विविध ठिकाणी ‘हे मृत्युंजय’ नाटकाचे प्रयोग केले जात आहेत. या नाटकाचा १३५ आणि १३६ वा प्रयोग सोमवारी कल्याणच्या अत्रे रंगमंदिरात झाला. त्याच्या दोन्ही प्रयोगांना तब्बल दोन हजार विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली. लवकरच हे नाटक १५० प्रयोगांकडे वाटचाल करणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत हे नाटक पोहोचविण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, असे सावरकर स्मारकाचे सदस्य सुनील वालावलकर यांनी सांगितले.वालावलकर पुढे म्हणाले, ‘आतापर्यंत ‘हे मृत्युंजय’ नाटक ९० हजार विद्यार्थ्यांना नि:शुल्क दाखविले आहे. तसेच ३५० महाविद्यालयांत त्याचे प्रयोग झाले आहेत. या नाटकाचे आठ प्रयोग हिंदीतूनही झाले आहेत. दिल्लीतील जेएनयू विद्यापीठातही १४ मार्चला हे नाटक दाखविले गेले. तेथे छत्रपती शिवाजी महाराज व सावरकरांचा पुतळाही बसविण्यात आला.’ते पुढे म्हणाले, ‘केवळ नाटकच नाही, तर सावरकर स्मारकाच्या वतीने राज्यातील एक हजार वाचनालयांना सावरकर लिखित साहित्य मोफत देण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकर हे युवा पिढीकडे मोठ्या आशेने पाहत होते. देश घडविण्यासाठी युवा पिढीच काहीतरी करू शकते, असा त्यांचा विश्वास होता. ‘हे मृत्युंजय’ नाटकात सावरकरांना जन्मठेपेची शिक्षा ब्रिटिशांनी सुनावली होती. अंदमान येथील सेल्युलर जेलमध्ये ११ वर्षे सावरकरांनी शिक्षा भोगली होती. ही शिक्षा भोगत असताना त्यांना काय यातना सहन कराव्या लागल्या, हेच या नाटकातून मांडले आहे. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी काय यातना सहन कराव्या लागल्या, स्वातंत्र्यवीरांना काय मोल मोजावे लागले, स्वातंत्र्याची किंमत कळावी, यासाठी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना हे नाटक मोफत दाखविले जात आहे. सावरकरांचे विचार प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविणे हा त्यामागचा हेतू आहे. शालेय पुस्तकातून जे शिकविले जात नाही, ते या नाटकातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविले आहे. हे नाटक प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर आणि कोषाध्यक्षा मंजिरी मराठे यांनी पुढाकार घेतला आहे.’ दरम्यान, नाटकाच्या प्रयोगासाठी अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रेय कराळे यांनी उपस्थिती लावली. सावरकरांचा विचार अंगीकारण्याची प्रेरणा या नाटकातून विद्यार्थांनी घेतली पाहिजे, असे आवाहन विद्यार्थ्यांना केले....तर नाटकाचे फलितआजचा विद्यार्थी छोट्यामोठ्या कारणांमुळे अभ्यासाचा ताण घेतो. त्याचा राग आई-वडील व शिक्षकांवर काढतो. तसेच काही वेळेस वाममार्गालाही लागतो. ज्या स्वातंत्र्यवीरांनी आपले जीवन देशासाठी वाहिले, त्यांचेही वय फारसे नव्हते. विद्यार्थीदशेपासून त्यांनी स्वातंत्र्याचा मंत्र अंगीकारला. तो प्रत्यक्षात आणला. ती प्रेरणा सावरकरांपासून घेऊन विद्यार्थ्यांनी देश घाडविण्याचे काम केल्यास ‘हे मृत्यंजय’ नाटकाचे फलित झाले, असे म्हणता येईल, असे वालावलकर यांनी नमूद केले.
स्वा. सावरकर प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवणार, कल्याणमध्ये ‘हे मृत्युंजय’चा विशेष प्रयोग
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 1:00 AM