ठाणे : ठाणे पूर्वेतील सावरकरनगर येथे बांधण्यात येणाऱ्या मोबाईल टाॅवरला स्थानिक रहिवाशांनी विरोध केला आहे. याआधी दोनवेळा या टॉवरचे काम रहिवाशांनी आंदोलन करून बंद पाडले होते. आता त्याची पुनरावृत्ती होत असल्याने या कामाला स्थगिती देण्याची मागणी स्वा. सावरकरनगर रहिवासी सेवा मंडळाने मंगळवारी ठाणे महापालिकेला निवेदनाद्वारे केली आहे.
सावरकरनगर हा परिसर खाडीलगत असल्याने प्रदूषणविरहित आहे. येथे विविध प्रकारचे पक्षी येत असतात. स्थलांतरित पक्षीही काही कालावधीसाठी वास्तव्यास येतात. त्यांचे निरीक्षण करण्यासाठी पक्षिमित्रांची संख्याही उल्लेखनीय असते. तसेच, हा परिसर आता सकाळचा फेरफटका मारण्यासाठीही प्रसिद्ध आहे. त्यामुळे सकाळी येथे शेकडो व्यायामप्रेमी फिरण्यासाठी येत असतात, तसेच सायंकाळीदेखील नागरिक फिरण्यासाठी येतात. या परिसरात रहिवासी वस्ती मोठी आहे. या परिसरात मोबाईल टाॅवर उभारल्यास ज्येष्ठांपासून आबालवृद्धांपर्यंत सगळ्यांच्या जिवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे या ठिकाणी मोबाईल टाॅवर उभारण्याला आमचा विरोध आहे, असे मंडळाचे सरचिटणीस पुंडलिक घाग यांनी सांगितले. मोबाईल टाॅवरच्या रेडिएशनमुळे हृदयविकाराचा त्रास, श्वसनाचा त्रास होऊ शकतो. याआधीही दोनदा येथे मोबाईल टॉवर उभारण्याचे काम सुरू केले होते; पण नागरिकांनी आंदोलन केल्यामुळे ते थांबविण्यात आले. या मोबाईल टाॅवरला कायम विरोध असल्याचे मंडळाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.