ठाणे - आज १५३ व्या महात्मा गांधी जयंतीच्या दिनी ठाण्यात समता विचार प्रसारक संस्था, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, श्रमिक जनता संघ, व्यसन मुक्ति अभियान, स्वराज इंडिया,भारतीय महिला फेडरेशन आदि समविचारी संस्था संघटनांनी नफरत छोडो, संविधान बचाओ या अभियानांतर्गत रॅलीचे आयोजन केले होते. देशभरातील जन आंदोलनांनी ९ ऑगस्टला जाहीर केल्याप्रमाणे २ ऑक्टोबर गांधी जयंती ते १० डिसेंबर मानवाधिकार दिन या काळात देशभर नफरत छोडो, संविधान बचाओ हे अभियान होत असून त्याची ठाण्यात आज सुरुवात करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून सुरू झालेल्या या रॅलीची सांगता तलावपाळीवरील म. गांधींच्या पुतळ्याजवळ झाली. यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रमिक जनता संघाचे जगदीश खैरालिया यांनी सांगितले की, ७५ वर्षांनंतरही देशात धर्माधर्मातील, जातीपातीतील विद्वेष संपला नाहीये, दलितांवरील, स्त्रियांवरील अन्यायात दिवसेंदिवस वाढ होते आहे, काही वेळा सरकारकडून या वृत्तीला खतपाणी घातले जात आहे असे दिसून येते, या संदर्भात आम्ही जनतेपाशी जाऊन त्यांच्याशी संवाद करणार आहोत. या साठी देशातील सुमारे ५०० जिल्ह्यांत स्थानिक स्तरावर विकेंद्रीत स्वरुपात किमान ७५ किमीच्या पदयात्रा, संवाद सभा आदी कार्यक्रम नियोजित केले आहेत. अभियानाची सुरुवात ठाण्यात आजच्या रॅलीने केली आहे.
ठाणे जिल्ह्यात ७५ कि.मी.ची पदयात्रा काढली जाणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. सर्व ठाणेकरांनी या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी या वेळी केले. यावेळी वंदना शिंदे, मतीन शेख, निर्मला पवार यांनीही मनोगत व्यक्त केले. हर्षलता कदम, अजय भोसले, ललित मारोठिया, प्रवीण खैरालिया, सुब्रोतो भट्टाचार्य, उमाकांत पावसकर, मीनल उत्तुरकर, टिशा देठीया सुनील दिवेकर, हर्षलता कदम, प्रत्युश, मनोज पवार, रघुनाथ चौधरी, भूषण खवळे, सुनील पाटील, सुनीता कुलकर्णी, निर्मला पवार, सुशांत जगताप, स्वप्नील भगत, आदान शेख आदी विविध संघटनांचे कार्यकर्ते यात सामील झाले होते.