डोंबिवली : शहरातील सावित्रीबाई फुले कलामंदिरातील कॉन्फरन्स हॉलमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास भटारखाना चालू असल्याचे अष्टगंध एंटरटेन्मेंट नाट्य संस्थेचे धनंजय चाळके यांनी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघडकीस आले आहे. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनीही या ‘चोरधंद्याची’ चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे. मात्र, नाट्यगृह व्यवस्थापनाने हे आरोप फेटाळले आहेत. नियमानुसारच भाड्याने कॉन्फरन्स हॉल दिल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. दरम्यान, व्यवस्थापनाच्या कारभाराच्या निषेधार्थ मनसेने रविवारी दुपारी फुले कलामंदिरात ठिय्या आंदोलन केले.केडीएमसीच्या महासभेने कल्याणमधील आचार्य अत्रे रंगमंदिर आणि डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले कलामंदिराच्या दरभाडेवाढीला नुकतीच मान्यता दिली आहे. याप्रकरणी मुंबई नाट्य निर्माता संघाने नाराजी व्यक्त केली आहे. त्यात आता सावित्रीबाई फुले कलामंदिरातील कॉन्फरन्स हॉलचा वापर रात्रीअपरात्री भटारखान्यासाठी होऊ लागल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. उंदीर, घुशी व चिचुंदरीच्या त्रासामुळे व होणाºया नुकसानामुळे खाद्यपदार्थ व जेवण करायला व बनवायला बंदी असताना ही बेकायदा परवानगी कोणी व का दिली, असे सवाल उपस्थित केले जात आहेत.चाळके यांनी केलेल्या स्ंिटग आॅपरेशनमध्ये हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी डोंबिवलीचे महापालिकेचे विरोधी पक्षनेते मंदार हळबे आणि सभागृह नेते राजेश मोरे व मनसे प्रदेश उपाध्यक्ष कदम यांना फोन केले. यातील केवळ कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली. नाट्यगृहाच्या पहिल्या मजल्यावरील कॉन्फरन्स हॉलचे भटारखान्यात रूपांतर झाले होते. तेथे भरलेले सात गॅस सिलिंडर होते. रात्रीअपरात्री चाललेल्या भटारखान्यामुळे जर आग लागली, तर कोण जबाबदार राहील, कॉन्फरन्स हॉल नाटकांच्या तालमीसाठी उपलब्ध नसतो, मग भटारखान्यासाठी कसा उपलब्ध होतो, असे मुद्दे चाळके आणि कदम यांनी उपस्थित केले आहेत.भटारखाना हा नेहमीचाच सुरू असतो. तेथे जेवण बनवून ते बाहेर आॅर्डरनुसार पुरवले जाते. हा बेकायदा व्यवसाय कोण चालवतो, अशा बेकायदा व्यवसायातून पैसा कमावण्यासाठी नाट्यगृहांची भाडेवाढ केली नाही ना, जेणेकरून नाटक कंपन्या येणार नाहीत, असा तर डाव नाही ना, अशीही शंका त्यांनी व्यक्त केली आहे.दरम्यान, रविवारी दुपारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी जाब विचारण्यासाठी नाट्यगृहाला धडक दिली असता, तेथे मांसाहाराचा घाट घालण्यात आल्याचे निदर्शनास आले. या वेळी चाळके हे देखील त्यांच्यासोबत होते. या वेळी मनसे कार्यकर्त्यांच्या वतीने ठिय्या आंदोलन छेडण्यात आले. अखेर, महापौर राजेंद्र देवळेकर यांनी ठोस कारवाई करण्याच्या दिलेल्या आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.यासंदर्भात सावित्रीबाई फुले कलामंदिरचे व्यवस्थापक दत्तात्रेय लधवा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित आरोप फेटाळून लावले. महापालिकेने तयार केलेल्या नियमावलीनुसारच कॉन्फरन्स हॉल एका संस्थेला जेवण बनवण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यांनी रीतसर भाडेही भरले असून त्याचीही नोंद दप्तरी आहे. रविवारी सकाळी लवकर त्यांचा कार्यक्रम होता, त्यामुळे त्यांनी रात्रीपासूनच कॉन्फरन्स हॉलचा ताबा घेतला होता. यात कोणताही बेकायदा प्रकार घडलेला नाही, असे ते म्हणाले.नाट्यगृहाच्या भाडेदरवाढीस मनसेचा नंतर विरोधआचार्य अत्रे रंगमंदिर आणि डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले कलामंदिराच्या भाडेदरवाढीला बुधवारी केडीएमसीच्या महासभेने मान्यता दिली. या भाडेदरवाढीस सभागृहात मनसेच्या नगरसेवकांनी विरोध केला नसताना मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी विरोध दर्शवला आहे. यासंदर्भात आयुक्त पी. वेलरासू यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले जाणार आहे. दरम्यान, मनसेची दुटप्पी भूमिका चर्चेचा विषय ठरली आहे.महासभेच्या सभागृहात हा विषय चर्चिला जात असताना मनसेचे पदाधिकारी तसेच सदस्यांनी एक अवाक्षरही काढले नाही. या महासभेत विरोधी पक्षनेते मंदार हळबे हे उपस्थित नव्हते. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदाची प्रभारी जबाबदारी प्रकाश भोईर यांच्याकडे होती. तर, गटनेतेपदी पवन भोसले होते. या पदाधिकाºयांसह अन्य सदस्यांनी दरवाढीच्या प्रस्तावाला विरोध केला नाही. मात्र, आता कदम यांनी दरवाढीला विरोध केला आहे. यावरून मनसेचे पदाधिकारी, नगरसेवक व संघटनेतील पदाधिकाºयांमध्ये ताळमेळ नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.दरम्यान, नाट्यगृहांच्या भाडेदरवाढीचा अहवाल तयार करणाºया समितीचा मीही एक भाग होतो. कलाकारांचा विचार करून हा अहवाल तयार केला आहे, असे प्रभारी विरोधी पक्षनेते भोईर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
सावित्रीबाई फुले कलामंदिरातील कॉन्फरन्स हॉलमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास भटारखाना चालू असल्याचे उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 6:46 AM