कल्याण : केडीएमसी मुख्यालयातील स्वा. विनायक दामोदर सभागृहाच्या छताचे पीओपी १२ जुलै २०१७ ला कोसळले होते. या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन यातील दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई होईल, असा अंदाज वर्तविला जात होता. परंतु, याप्रकरणी झालेल्या चौकशीनंतर हलगर्जीचा ठपका ठेवत संबंधित अधिकाऱ्यांना केवळ समज देण्यात आली. छत कोसळल्याच्या घटनेला शुक्रवारी दोन वर्षे होत असून, अद्याप या सभागृहाचे नूतनीकरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे महापालिकेचा उदासीन कारभार पाहावयास मिळत असून, त्याचे कोणतेही गांभीर्य प्रशासन, पदाधिकारी व नगरसेवकांना नसल्याचेही स्पष्ट होत आहे.
मुख्यालयातील महापालिका भवन इमारतीत चौथ्या मजल्यावरील या सभागृहात मासिक महासभेसह मोठ्या बैठका होतात. पीओपी कोसळल्याच्या घटनेआधी या सभागृहात ७ जुलै २०१७ ला तहकूब महासभा झाली होती. तर १२ जुलैला विधिमंडळ सदस्यांची या सभागृहात बैठक होणार होती. त्यासाठी ११ जुलैला सायंकाळी या सभागृहाची पाहणी करून ते बैठकीसाठी सज्जही ठेवण्यात आले होते. परंतु, दुसºया दिवशी १२ जुलैच्या सकाळी ९ वाजता सभागृहाच्या छताला असलेले पीओपी सांगाड्यासह खालील आसनव्यवस्थेवर कोसळले. त्यामुळे महापालिकेचा बांधकाम विभाग आणि देखभाल दुरुस्ती करणारा कंत्राटदार वादाच्या भोवºयात सापडले.
छत कोसळल्याच्या घटनेची चौकशी अतिरिक्त आयुक्त संजय घरत या वादग्रस्त अधिकाºयाकडे सोपविण्यात आली होती. चौकशी करून याचा अहवाल १५ दिवसांत सादर करा, असे आदेश असताना तीन महिन्यांनी चौकशी अहवाल तत्कालीन आयुक्त पी. वेलरासू यांना सादर करण्यात आला. याप्रकरणात मागील १५ वर्षांच्या कालावधीत असलेले बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता आणि उपअभियंता यांची माहिती सामान्य प्रशासन विभागाकडून मागवण्यात आली होती.
१५ वर्षांतील तपशील तपासला गेल्याने हलगर्जी नेमकी कोणाची? छत कोसळल्याचा ठपका नेमका ठेवायचा तरी कोणावर? या संभ्रमात प्रशासन होते. अखेर यातून केवळ ‘समज’ देण्यापुरतीच कारवाई करण्यात आली. यावर सभागृहात बसणाºया नगरसेवकांनीही तोंडात मिठाची गुळणी धरल्याने एकूणच पीओपी कोसळल्याच्या घटनेचे त्यांनाही कितपत गांभीर्य होते, हे देखील त्यातून स्पष्ट झाले.निविदा प्रक्रिया सुरू : सभागृहाच्या नूतनीकरणाचे काम बांधकाम विभाग व विद्युत विभागातर्फे केले जाणार आहे. त्यासाठी बांधकाम विभागाने निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामाचे कार्यादेशही दिले आहेत, अशी प्रतिक्रिया बांधकाम विभागाचे उपअभियंता श्रीकांत मुंडे यांनी दिली, तर विद्युतकामासाठी निविदा मागवल्या असून २२ जुलैच्या आसपास निविदा प्राप्त होतील, अशी माहिती विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता यशवंत सोनवणे यांनी दिली.कामाला मुहूर्त मिळणार कधी?छताच्या नूतनीकरणाचे काम केलेले नसल्याने आजही महापालिकेची महासभा याच धोकादायक सभागृहात भरवली जात आहे. गतवर्षी तत्कालीन शहरअभियंता प्रमोद कुलकर्णी यांनी, छताची गळती रोखण्याचे काम तसेच ध्वनियंत्रणेचे कामही केले आहे. लवकरच छताच्या नूतनीकरण कामाची निविदा काढून तेदेखील पूर्ण केले जाईल, अशी माहिती दिली होती. त्यामुळे १२ जुलैच्या वर्षपूर्तीनंतरच कामाला प्रत्यक्षात सुरुवात होईल, अशी शक्यता होती. परंतु, आज छत कोसळण्याच्या घटनेला दोन वर्षे उलटत आहेत, मात्र नूतनीकरणाच्या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही.