विरार: नुसते संवाद वाचणे म्हणजे अभिनय नव्हे. उत्तम अभिनेता होण्यासाठी चांगला खेळाडू असणे गरजेचे आहे. सर्व शारिरिक अवयवांचा वापर करता आला तरच तो उत्कृष्ट अभिनेता होऊ शकतो. सध्याच्या स्पर्धेच्या युगात त्याचा निभाव लागू शकतो, असे मत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी विरार येथे बोलताना व्यक्त केले. अमेय स्पोर्टसने विरार येथील यशवंत नगर येथे जिल्हास्तरीय कबड्डी आणि राज्यस्तरीय लगोरी स्पर्धेचे आयोजन केले आहे. यावेळी उपस्थित असलेल्या विक्रम गोखले यांनी आपले विचार मांडताना, उत्तम खेळाडू चांगला अभिनेता बनू शकतो. खेळाचा आणि चित्रपटाचा अतिशय जवळचा संबंध आहे. कराटे, हॉकी, बॉक्सींग यासह विविध खेळांशी संबंधित चित्रपट तयार झाले आणि प्रेक्षकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला, असेही गोखले यांनी यावेळी सांगितले. आपण स्वत: कराटे चॅम्पियन असून अनेक ठिकाणी खेळ आणि अभिनयाचे धडे देतो, असेही गोखले यांनी सांगितले. जिल्ह्यातील कबड्डीपटूंना प्रो कबड्डी लीगचे दालन उघडावे, महाराष्ट्रात त्यांची दखल घेतली जावी यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील उत्तम खेळाडू निवडून त्यांना योग्य ते प्रशिक्षण दिले जाईल, असे अॅकॅडमीच्या संचालिका ग्रीष्मा पाटील यांनी सांगितले. प्रथम महापौर राजीव पाटील, बविआचे संघटक सचिव अजीव पाटील, नगरसेवक हार्दिक पाटील, अॅकॅडमीच्या साधना पाटील, संतोष पिंगुळकर, दयानंद पाटील, अॅड. सुहास पाटील यावेळी उपस्थित होते. उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त विरारमध्ये प्रथमच महाराष्ट्राचा पारंपारिक खेळ लगोरीच्या प्रसारासाठी राज्यस्तरीय लगोरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. (वार्ताहर)
संवाद म्हणणे म्हणजे अभिनय नाही- गोखले
By admin | Published: April 21, 2016 2:01 AM