ठाणे : अन्न आणि औषध प्रशासनाची परवानगी नसतानाही, ठामपाच्या नळजोडणीतून पाणी घेऊन ते बाटली बंद पाणी म्हणून विकण्याचा गोरखधंदा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे विधानसभाध्यक्ष अभिषेक पुसाळकर यांनी उघडकीस आणला आहे.
अभिषेक पुसाळकर यांचा बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय आहे. त्यांच्यासह एफडीआयने प्रमाणित केलेले सात प्लांट कार्यरत आहेत. या सात कंपन्यांना बाटलीबंद पाणी विकण्याचा परवाना आहे. मात्र, ठामपाकडून खुले पाणी विकण्याची परवानगी असतानाही बाळकूम, राबोडी, ज्ञानेश्वरनगर आणि सावरकरनगर या भागात अनुक्रमे विहाना इंटरप्रायजेस, साई सागर, क्षिप्रा चिल्ड वाॅटर, सागर चिल्ड वाॅटर, संतोष चिल्ड वाॅटर या कंपन्या ठामपाच्या नळाचे पाणी कोणतीही प्रक्रिया न करता, जारमध्ये भरून बेकायदा विकत आहेत. ठामपाच्या अर्धा इंच पाइपलाइनमधून हे पाणी भरण्यात येत आहे. सोमवारी दुपारी खोपट येथे पुसाळकर हे उभे असताना, विकी पाटील यांच्या विहाना इंटरप्रायजेसच्या एका वाहनातून जारला बिस्लरीचे लेबल लावून पाण्याची वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी त्यांनी चौकशी केली असता, हा प्रकार उघडकीस आला. या संदर्भात त्यांनी राबोडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मात्र, कागदपत्रे तपासून गुन्हे दाखल करण्यात येतील, असे यावेळी पोलिसांनी सांगितले.
-----------------