रोहिदास पाटीलअनगाव : भिवंडी तालुक्यातील कोन ग्रामपंचायतअंतर्गत असलेल्या तरीचापाडा या आदिवासीपाड्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून येथील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पाणीसमस्येकडे भिवंडी पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने दरवर्षी या पाड्याला टंचाईचा सामना करावा लागत आहे.
कोनगावाजवळील या पाड्यात पाणीपुरवठा विभाग व कोन ग्रामपंचायतीच्या वतीने बोअरवेल व विहीरही बांधलेली नाही. त्यामुळे अनेक वर्षांपासून येथील नागरिकांना पाण्यासाठी कधी कल्याण, तर कोनगावाजवळील गोदामातील कामगारांसाठी असलेल्या नळाचा आधार घ्यावा लागतो. मुळात या पाड्यात सरकारच्या कुठल्याच योजना राबवण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे ‘मेक इन इंडिया’, ‘सबका साथ सबका विकास’ या घोषणा केवळ कागदावरच राहिल्याचे दिसून येते. स्वच्छतागृह, पाण्याची सुविधा नसल्याने स्वच्छ भारत अभियानाचा पुरता बोजवारा उडाला आहे.
दुसरीकडे पाणीपुरवठा विभाग तालुक्यात पाणीटंचाई नसल्याचा कांगावा करत आहे. येथील आदिवासी, कष्टकरी समाजबांधवांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे, याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. येथील अधिकाऱ्यांना पाणीटंचाई कधीच माहीत नसते, याला काय म्हणायचे, असा संतप्त प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. तर, भिवंडी पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, सदस्यांनी पाणीटंचाईकडे लक्ष द्यावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
भिवंडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक सोनटक्के हे पाणीटंचाईकडे कधी लक्ष देणार, अन्यथा आम्हालाच पंचायत समितीवर हंडे घेऊन धडक मारावी लागेल, असा इशारा अनिता वाघ या कार्यकर्तीने केला आहे. हा पाडा कोन जिल्हा परिषद गटात येत असून सदस्यांनी टंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
या पाड्यात तीव्र पाणीटंचाई आहे. ती दूर न केल्यास पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालू. - गणपत हिलम, अध्यक्ष, श्रमजीवी संघटना, कातकरी घटक
या पाड्यात पाणीटंचाई आहे, हे खरे आहे. ती दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सरपंच, उपसरपंच यांनी याकडे लक्ष दिले आहे. - व्ही.डी. धोंडगे, ग्रामविकास अधिकारी