लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मानसीक आजाराचे दोन प्रकार आहेत, सायकोसीस ज्यात रुग्णाला कळत नाही की त्याला आजार आहे आणि न्युरोसीस, ज्यात रुग्णाला कळते की त्याला मानसिक आजार आहे आणि उपचार घ्यायला हवे. स्कीझोफ्रेनिया हा आजार एक टक्का रुग्णामध्ये आढळतो पण आपण त्याला सगळेच घाबरतो. ५० टक्के लोकांमघ्ये नैराश्य आहे पण त्याचा विचार करत नाही. २० ते ३० टक्के लोकांमध्ये व्यसनाधीनता आहे, मग ती मोबाईलची असो की अंमली पदार्थांची, काहींना पर्सनॅलिटी डिसऑर्डर हा आजार आहे. पण हे सगळे सोडून आपण स्कीझोफ्रेनिया सारख्या आजाराला घाबरतो आणि यामुळेच आपण मानसोपचारतज्ज्ञांकडे जाणे टाळतो असे प्रतिपादन मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अंजली देशपांडे यांनी व्यक्त केले.
जागतिक मानसीक आरोग्य दिनानिमित्त मंगळवारी कौटुंबिक न्यायालयाच्यावतीने डॉ. देशपांडे यांचे मानसीक आजार या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी त्या म्हणाल्या की, मानसीक आजार म्हणजे वेडेपणा असा गैरसमज आपण करु नघेतलेला आहे. अनेक लोकांमध्ये मानसीक आजार हा अनुवंशिक असल्याचे आढळून येते. मानसीक स्वास्थ्य राखण्यासाठी खेळ हा महत्त्वाची भूमिका बजावतो. विविध प्रकारांचे खेळ खेळल्याने तुमचे मानसीक आरोग्य चांगले राहते. मानसोपचारतज्ज्ञांकडे येणारा वयोगट हा १५ ते २५ वयोगटातील आहे आणि ते स्वत: पालकांना सांगतात की मला मानसोपचारतज्ज्ञांकडे जाण्याची गरज आहे इतकी जागरुकता वाढल्याचे निरीक्षण डॉ. देशपांडे यांनी नोंदविले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख न्यायाधीश शाम रुकमे यांनी देखील ३६५ दिवस आपले मानसीक स्वास्थ्य चांगले ठेवण्याचा सल्ला उपस्थितांना दिला. विवाह समुपदेशक वंदना शिंदे यांनी प्रास्ताविक तर सुरेखा रणखांबे यांनी सुत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले.