ठाणे: शिक्षणाचा हक्क म्हणजे आर.टी.ई. द्वारे जिल्ह्यातील नऊ हजार 326 बालकांची निवड झाली आहे. या बालकांचे शालेय प्रवेश कोरोनाच्या या कालावधीत रखडलेले आहे. याकडे लक्ष केंद्रीत करुन या प्रवेशासाठी लॉटरीद्वारा निवड झालेल्या या बालकांचे शालेय प्रवेशाच्या एसएमएसची पालकांनी वाट न पाहता 31ऑगस्टपर्यंत शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावेत, असे आवाहन ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांनी केले आहे.
वंचित गटातील, दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शाळेचे इ 1 ली ते 8 वीपर्यंतचे शिक्षण विनाशुल्क मिळावे यासाठी शासनाने या घटकातील बालकांसाठी इ.1 लीच्या मंजूर जागांच्या 25 टक्के प्रवेश हे त्या त्या शाळांच्या प्रथम प्रवेशस्तरावर करावयाचे आहेत. यासाठी ठाणे जिल्हयातील पाच तालुके, सहा मनपा क्षेत्रातील शाळांमधील प्रवेशासाठी आर.टी.ई. द्वारे लॉटरीद्वारा 17 मार्चला निवड प्रक्रीया पुर्ण करण्यात आली आहे. याद्वारे जिल्ह्यातील तब्बल नऊ हजार 326 अर्जांची निवड झाली आहे.
लॉटरीद्वारे निवड झालेल्या या बालकांना प्रवेशाचा दिनांक मेसेज द्वारे कळविला जाईल. परंतु पालकांनी फक्त मेसेजवर अवलंबून राहू नये. आर.टी.ई.पोर्टलवर प्रवेशाची तारीख या ठिकाणी आपला अर्ज क्रमांक टाकून प्रवेश घेण्याचा दिनांक पाहावा. शाळेत प्रवेश घेण्यासाठी सर्व पालकांनी गर्दी करू नये. तसेच प्रवेश घेण्यासाठी जाताना बालकांना आपल्या बरोबर नेऊ नये,असे मार्गदर्शन पालकांसाठी करण्यात आले आहे.
निवड यादीतील बालकांच्या पालकांना लॉक डाऊन मुळे बाहेरगावी असल्याने किंवा अन्य कारणामुळे शाळेत प्रत्यक्ष जाऊन प्रवेश घेणे शक्य नसेल तर त्यांनी शाळेशी संपर्क करावा आणि व्हॉट्स अँप, ईमेल किंवा अन्य माध्यमे यांचे द्वारा बालकाच्या प्रवेशाची आवश्यक कागदपत्रे सादर करावीत आणि आपल्या पाल्याचा शाळेतील तात्परता प्रवेश निश्चित करावा.
पालकांनी शाळेत प्रवेशाकरिता घेऊन जाण्याची कागदपत्रे -
1) प्रवेशासाठी लागणारी मूळ कागद पत्रे आणि छायांकीत प्रती.2) आर.टी.ई.पोर्टलवरील हमी पत्र आणि अर्जाची स्थिती यावर क्लिक करून हमी पत्र आणि ऑलॉटमेंट लेटरची प्रिंट काढून शाळेत घेऊन जावे.* महत्वाचे :- प्रतीक्षा यादीमधील पालकांनी बालकांच्या प्रवेशाकरिता सध्या शाळेत जाऊ नये. त्यांच्या करिता स्वतंत्र सूचना आर.टी.ई.पोर्टलवर नंतर दिल्या जातील .