सुरेश लोखंडे, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: जिल्ह्यातील वंचित गटातील व दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक स्तरावरील इ १ ली ते ८ वी पर्यंतचे शालेय शिक्षण विनाशुल्क दिले जात आहे. त्यासाठी शिक्षणाचा हक्क या कायद्यांतर्गत २५ टक्के मोफत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. यासाठी निवड झालेल्या दहा हजार ९९६ विद्यार्थ्या र्पैकी अवघ्या दाेन हजार १४५ विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रवेश मुदती अखेर निश्चित केले. उर्वरीत बालकांच्या प्रवेशासाठी ८ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या आधी २५ एप्रिलपर्यंत प्रवेश निश्चित करण्याची मुभा हाेती.
जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या वर्गासाठी शालेय प्रवेश प्रक्रीया २०२३-२४ हाती घेण्यात आलेली आहे. यासाठी ठाणे जिल्हयातील पाच तालुके व सहा मनपा कार्यक्षेत्रात आर.टी.ई.च्या २५ टक्के आरक्षित प्रवेशासाठी लॉटरी पध्दतीने झालेल्या निवड यादीमध्ये ठाणे जिल्हयातील एकूण १० हजार ९९६ विद्यार्थ्या र्ची निवड झाली आहे. त्यापैकी मुदती अखेर अवघ्या दाेन हजार १४५ बालकांचे प्रवेश निश्चित झालेले आहेत . निवड झालेल्या उर्वरीत बालकांच्या प्रवेशासाठी ८ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
निवड झालेल्या बालकांच्या पालकांनी ऍडमिट कार्ड तसेच हमी पत्राची ची प्रिंट आणि आवश्यक कागदपत्रे घेऊन संबंधित तालुका, महानगरपालिकेच्या पडताळणी केंद्रावर जाऊन पालकांनी पडताळणी समितीकडून दिलेल्या मुदतीत पाल्याचा प्रवेश निश्चित करावा. प्रवेश निश्चित झाल्याची पावती व कागदपत्रे शाळेत जमा करून प्रवेश निश्चित करावा. प्रवेश पात्र बालकांच्या पालकांना अर्ज करताना नोंदवलेल्या मोबाईलवर एसएमएसवर प्राप्त होतील परंतु या एसएमएस वर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवरील अर्जाची स्थिती या टॅब वर अर्ज क्रमांक लिहून आपल्या पाल्याची निवड झाली अथवा नाही याची पालकांनी खात्री करून घ्यावी. या निवड यादीतील विद्यार्थ्यानी प्रवेश घेण्याची मुदत संपल्यानंतर मगच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे एसएमएस पाठवले जातील. या प्रवेश प्रक्रियेतील अडचणींसाठी संबंधित तालुका, मनपा कार्यक्षेत्रातील सक्षम अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन ठाणे जि.प.चे शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी केले आहे.