कोरोना महामारीमुळे राज्य सरकारने शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शाळेत विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या स्कूल बसचालक-मालकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे हा उद्योग संकटात सापडला आहे. अनेक नागरिक बेरोजगार झाले आहेत. तसेच काही बसचालक रिक्षा चालवून तर काही जण भाजीची दुकाने थाटून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. राज्य सरकारने आम्हाला कर माफ करावा तसेच दर पंधरा वर्षांनंतर स्क्रॅपमध्ये टाकण्यात येणाऱ्या बसची मुदत किमान दोन ते तीन वर्षांनी वाढवून द्यावी, अशी मागणी बसचालक-मालकांकडून करण्यात येत आहे. रिक्षाचालकांना जसे दरमहा पंधराशे रुपये अनुदान सरकारकडून देण्यात येते तसेच आमच्यासाठीही द्यावे, अशी विनंतीही बसचालक-मालकांकडून करण्यात आली. त्यातच दोन वर्षांपासून बसचा एकही ईएमआय माफ झाला नसला तरी अनेक बसेस एकाच जागी उभ्या असल्याने त्या नादुरुस्त झाल्या आहेत. त्यामुळे या बस भंगारात विकण्याची वेळ या चालकांवर आली आहे. याचाही सरकारने विचार करावा.
-------------
स्कूल बसचालक आणि मालक यांचे दीड ते दोन वर्षांत प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र, शासन त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत आहे. शासनाने स्कूल बसचालक-मालक आमच्या बाबतीतही धोरणात्मक निर्णय जाहीर करावा, आणि हातभार द्यावा.
- लक्ष्मीकांत कोसंधर, अध्यक्ष, अंबरनाथ-बदलापूर स्कूल बस असोसिएशन