शहापूर : शाळांमध्ये शिजवली जाणारी खिचडी १ डिसेंबरपासून बंद होण्याची शक्यता आहे. तांदळाशिवाय अन्य साहित्याचा पुरवठा होत नसल्याने शाळांमधून पोषण आहार शिजवणे बंद करणार असल्याचा इशारा ठाणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटनेने दिला आहे.ठाणे जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीने आक्र मक होत ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांची भेट घेऊन याबाबतचा इशारा दिला आहे.पोषण आहार योजनेंतर्गत प्रत्येक शाळेतून खिचडी शिजवण्याचे काम शिक्षकांना देण्यात आले आहे. यापूर्वी खिचडी शिजवण्यासाठी तांदूळ, विविध प्रकारच्या डाळी, त्याचबरोबर मीठ, मसाला, तेल आदी साहित्यांचाही पुरवठा केला जात होता. मात्र, जुलै २०१७ पासून तांदळाशिवाय इतर साहित्याचा पुरवठा बंद करण्यात आला. त्याऐवजी हेच साहित्य बाजारातून विकत आणायची जबाबदारी मुख्याध्यापकांवर टाकली आहे. परंतु, खरेदीचे दर तसेच साहित्य कुठून खरेदी करायचे, याबाबत निश्चित असे कोणतेच निकष उपलब्ध नसल्याने मुख्याध्यापकांची मोठी गैरसोय होते आहे. त्यामुळेच ३० नोव्हेंबरपर्यंत पोषण आहार साहित्याचा (डाळ, मीठ, मसाला, तेल इ.) पुरवठा न झाल्यास १ डिसेंबरपासून शाळाशाळांत पोषण आहार शिजवून देण्याचे काम बंद करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.याशिवाय, आॅनलाइन कामाचे नियोजन करावे, माध्यान्ह भोजनाची कार्यवाही करताना एप्रिल २०१७ पासून शासनाने अजून एकही देयक दिलेले नाही. ही योजना राबवताना शिक्षकांना पदरमोड करावी लागत असल्याने यासाठी स्वतंत्र योजना राबवून या कामातून शिक्षकांना मुक्त करावे. चटोपाध्याय वेतनश्रेणी, निवडश्रेणीचा प्रस्ताव गेल्या सहा महिन्यांपासून शिक्षणाधिकारी कार्यालयात धूळखात पडून आहेत. याबाबतीत संघटनेने वेळोवेळी पाठपुरावा करूनही मंजुरी दिली जात नाही, तरी डिसेंबरपर्यंत मंजुरी मिळावी. बीएलओच्या कामातून शिक्षकांना मुक्त करावे. विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा व क्र ीडा स्पर्धांसाठी तालुकास्तरावर अनुदान वाढवावे, अशा अनेक मागण्यांचा अंतर्भाव या निवेदनात केला आहे.
आज होणार चर्चा पोषण आहारासंदर्भात चर्चा करण्यासाठी सोमवारी, २० नोव्हेंबरला ठाणे जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय संघटनेच्या पदाधिकाºयांना मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी ठाण्याला बोलावल्याचे सुधीर भोईर यांनी सांगितले.