लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जवळजवळ २८ टक्के मुला-मुलींमध्ये जंतदोष असतो, असा जागतिक आरोग्य संघटनेचा अंदाज आहे. त्यास वेळीच पायबंद घालण्यासाठी १ ते १९ वर्षांपर्यंतच्या मुली-मुलांना या जंतनाशक गोळ्या दिल्या जातात; पण शाळा बंद असल्यामुळे या गोळ्यांचे जिल्ह्यात वाटप झाले नाही. त्यावर उपाय म्हणून जिल्ह्यातील चार लाख चार हजार ९३२ मुलामुलींच्या घरोघरी जाऊन आरोग्य विभाग या गोळ्यांचे गांवपाड्यात वाटप करीत आहे.
कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी हाताळलेल्या विविध उपाययोजनांमध्ये शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या जंतनाशक गोळ्या वाटपाचा उपक्रम रखडला. पण आता त्याची आठवण झाल्याने संभाव्य संकटावर मात करण्यासाठी जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक मोहीम हाती घेतलेली आहे. एक आठवड्यात म्हणजे २८ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील चार लाख चार हजार ९३२ मुलांना या जंतनाशक गोळ्यांचे वाटप सुरू करण्यात आले आहे. आठवडाभरापूर्वी भिवंडीच्या अंजुर येथील शाळेतून या मोहिमेचा शुभारंभ झाला. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत १ ते १९ वर्ष वयोगटातील शालेय व शालाबाह्य चार लाख चार हजार ९३२ मुला-मुलींना जंतनाशक गोळीचे वाटप युद्धपातळीवर सुरू आहे.
सुदृढ आरोग्य लाभावे व संभाव्य संकटावर मात करणे शक्य व्हावे यासाठी या जंतनाशक गोळ्यांचे १९ वर्षांपर्यंत द्याव्या लागतात. पण कोरोनामुळे यांचे वाटप रखडले होते. त्यामुळे आता जिल्ह्यातील मुला-मुलींना या आरोग्यवर्धक जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, उत्तम पोषण स्थिती निर्माण करून शिक्षण व जिवनाचा दर्जा उंचावणे शक्य आहे. जिल्ह्यातील ८८ शाळांमधील विद्यार्थ्यांसह सर्व शाळाबाह्य मुला-मुलींना आशा आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांद्वारे या जंतनाशक गोळ्यांचे घरोघरी जाऊन वाटप केले जात आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंघे यांनी दिली. या गोळ्यांचे महत्त्व लक्षात घेऊन ठाणे जिल्हा परिषद अध्यक्षा पुष्पा पाटील, उपाध्यक्ष सुभाष पवार, आरोग्य व बांधकाम सभापती वंदना भांडे आदी सर्व स्थानिक पदाधिकारी,अधिकारी जास्तीत जास्त मुला-मुलींना या गोळी देण्यासाठी जिल्हा दौऱ्यावर आहेत.