अंबरनाथ : आपल्या गोशाळेतून पर्यावरण रक्षणासाठी अजय दसपुते यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी गाईच्या शेणापासून कोणत्याही रसायनांचा वापर न करता सुगंधी धूप आणि होळीसाठी काड्या तयार करण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. भविष्यात अंत्यसंस्कारासाठीही शेणाच्या काड्यांचा वापर करण्यासाठी पुढाकार घेण्यात येणार असल्याचेही दसपुते यांनी सांगितले.
आपली बड्या रकमेची नोकरी सोडून अंबरनाथकर असलेले दसपुते यांनी गोशाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. लोकनगरीजवळील फार्मिंग सोसायटीमध्ये त्यांनी भाडेतत्त्वावर जागा घेतली आणि सुरुवातीला चार गाई घेऊन दुग्धव्यवसाय सुरू केला. आज त्यांच्याकडे साधारण २० ते २५ देशी गाई आहेत.
आपल्या उपजीविकेसाठी दूध व्यवसाय तर आहेच, मात्र सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या गोशाळेत सुगंधी धूप, होळीसाठी काड्या तसेच भविष्यात अंत्यसंस्कारासाठीदेखील लाकडांचा वापर न करता शेणापासून तयार केलेल्या काड्यांचा वापर करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. दीड वर्षांपूर्वी गोठा भाड्याने घेऊन दसपुते यांनी हा व्यवसाय सुरू केला. सध्या या गोशाळेतून अंबरनाथ, उल्हासनगर, आणि बदलापूर परिसरातील ग्राहकांना ‘अ-२’दर्जाच्या दुधाचे वितरण होते. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांव्यतिरिक्त शेणखत, शेणाच्या लाद्या (शेणी), गोमूत्र हे आरोग्य आणि पर्यावरणासाठी उपयुक्त घटकही या गोशाळेत तयार होतात.
‘अग्निहोत्र’ करण्यासाठी सुकलेल्या शेणाच्या वड्या उपयुक्त ठरतात. ते सकाळ-संध्याकाळ जाळल्याने परिसरातील वातावरण शुद्ध होते. गाईच्या शेणात ३५ टक्के ऑक्सिजन असतो. ते वाळवून त्याच्या गोवऱ्या केल्यावर त्यातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढून ४५ टक्के इतके होते. त्या जाळल्यावर तयार होणाऱ्या धुरावाटे ५५ ते ८० टक्के ऑक्सिजन हवेत सोडला जातो, अशी माहिती दसपुते यांनी दिली.