कल्याण : पूर्वेतील साई इंग्लिश स्कूलने विद्याथ्र्याना फी भरण्याची सक्ती केल्याने पालकांसोबत शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी शुक्रवारी शाळेत धाव घेतली. यावेळी चर्चेअंती फी ३५ टक्के कमी करण्याचे शाळा व्यवस्थापनाने मान्य केले आहे. त्यामुळे पालकांना दिलासा मिळाला आहे.
साई इंग्लिश स्कूलने फी भरण्याची सक्ती केल्याने पालकांनी याप्रकरणी गायकवाड यांच्याकडे तक्रार केली. त्यानुसार, त्यांनी शुक्रवारी शाळा व्यवस्थापनाची भेट घेतली. लॉकडाऊनमुळे अनेक पालकांचे रोजगार गेले आहेत. तर, काहींच्या पगारात कपात झाली आहे. त्यामुळे ते मुलांची फी कशी भरणार, असा सवाल गायकवाड यांनी केला. तसेच शाळेकडून विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरू असल्याने इंटरनेटजोडणी तसेच टॅब, मोबाइल, लॅपटॉपचा आर्थिक भरुदड पालकांना सोसावा लागत आहे. मग शाळेला कसली फी हवी आहे, असा प्रश्न पालकांनी केला.
शाळेने ५० टक्के फी कमी करावी, अशी पालकांची मागणी होती. याबाबत गायकवाड यांनी शाळेच्या संचालक मंडळातील पदाधिकारी गौतमी मैथिली, एम.जे. राठोड, गौतम घायवट, ममता चक्रवर्ती यांच्याशी चर्चा केली. ५० टक्के फी कमी करणे शक्य नसल्याचे शाळेने सांगितले. अखेरीस प्रदीर्घ चर्चेअंती शाळेने ३५ टक्के फी कमी करण्याचे मान्य केले. शाळा एका विद्याथ्र्याकडून वर्षाकाठी १३ हजार ३०० रुपये फी घेते. आता ३५ टक्के फी माफ झाल्याने पालकांना केवळ नऊ हजार रुपये फी भरावी लागणार आहे. त्यामुळे पालकांना दिलासा मिळाला आहे.
पालकांची मागणी विचारात घेऊन कपातशाळेच्या संचालिका गौतम मैथिली म्हणाल्या की, शाळेने ३५ टक्के फी माफ केली आहे. शाळा व्यवस्थापनाला शाळेच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च, शिक्षकांच्या पगाराचा खर्च आहे. त्यामुळे शाळाही आर्थिक अडचणीत आहेत. मात्र, पालकांची आर्थिक अडचण विचारात घेता ३५ टक्के फी कमी केली आहे.