जनार्दन भेरेभातसानगर : एसटी बंदचा फटका शहापूर तालुक्यात विद्यार्थ्यांना बसत असल्याने शिक्षणासाठी सहा ते आठ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शाळा व विद्यालयांमध्ये जाण्यासाठी दररोजची पायपीट करावी लागत आहे. यामुळे विद्यार्थी हैराण झाले असून पालकांची डोकेदुखी वाढली आहे.
एसटी बंद असल्याने भातसानगर माध्यमिक विद्यालयात कळमगाव कानविंदे, लाहे, बिरवाडी या गावातील विद्यार्थ्यांना सहा ते सात किलोमीटर अंतरावरून चालत यावे लागत आहे. किसान हायस्कूल नडगाव येथील हायस्कूलमध्ये शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थिनी शिरगाव, शेंद्रूण, जांभे, लेनाड, नेहरोली, ठिळे हायस्कूलमध्ये टेभरे, किन्हवली हायस्कूलमध्ये परिसरातील यापेक्षा अधिक अंतरावरून खर्डी, कसारा अशा तालुक्यांतील सर्वच हायस्कूलमध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोजची पायपीट करून शाळेत यावे लागत आहे.
काही शाळा सकाळी सात ते आठच्या दरम्यान भरतात दुपारी सुटतात, तर काही भरून संध्याकाळी सुटतात. त्या विद्यार्थ्यांना सकाळी एक तास आधीच घरातून निघावे लागत आहे. तर दुपारी भर उन्हात चालत यावे लागत आहे. संध्याकाळी सुटणाऱ्या शाळांतील विद्यार्थ्यांना घरी येण्यासाठी रात्र होत असते. दहावी-बारावीच्या परीक्षा जवळ येत असल्याने थकलेली मुले लवकर झोपी जातात. जाण्या-येण्याने आधीचा वेळही वाया जातो. याशिवाय दूर गावांना जाणाऱ्या प्रवाशांचीही मोठी ससेहोलपट होत असून अनेक यात्रा करणाऱ्या भाविकांना ही एसटी नसल्याने जाता येत नाही. शिवाय, खासगी बस या परवडणाऱ्या नसल्याने सर्वांची मोठी पंचाईत झाली आहे.
दीक्षा गोरे या आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या किसान हायस्कूलच्या विद्यार्थिनीने सांगितले की, एसटी बंद असल्याने आम्हाला दररोज सहा किलोमीटर पायी चालत जावे लागत आहे. हा दररोजचा प्रवास असल्याने आम्ही थकून जातो. तर शुभम पाटोळे या विद्यार्थ्यानेही ही अशीच प्रतिक्रिया दिली.बस बंद असल्याचा मोठा फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे; मात्र खासगी जीप ही वेळेवर नसल्याने मुलांची ससेहोलपट होत आहे.वैदेही नार्वेकर, माजी नगराध्यक्षखासगी प्रवासाचा भुर्दंड
- महामारीनंतर तालुक्यातील सर्वच शाळा सुरू झाल्या आहेत. आता बस बंदचा मोठा फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे.
- दररोजच्या चाकरमानी, नाकाकामगार, शासकीय कर्मचारी यांच्याबरोबरच दररोजच्या रोजी-रोटीसाठी शहराकडे जाणाऱ्यांना स्वतःची वाहने नसल्याने व पेट्रोल, डिझेल यांचे गगनाला भिडलेल्या भावामुळे परवडणारे नसल्याने त्यांचीही एसटी बंदमुळे मोठी कोंडी झाली आहे.
- आदिवासी कातकरी यांना खासगी जीपचे दर परवडणारे नसल्याने त्यांचीही मोठी पंचायत झाली आहे. शिवाय खासगी जीपवाले अधिक भाडे आकारणी करीत असल्याने आर्थिक ताण पालकांच्या खिशावर पडत आहे.