ठाणे : जगभरच आकुंचन पावणारे वनक्षेत्र, वन्यप्राण्यांची संख्या कमी होणे,वनसंपत्तीच्या काही जाती कायमस्वरूपी नष्ट होणे, या व अशा अनेक कारणांनी हा सप्ताह भारतीय वन्यजीव सप्ताह म्हणून साजरा केला जातो. वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने पर्यावरण दक्षता मंडळ हि संस्था विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाबद्दल प्रबोधन निर्माण व्हावे म्हणून दरवर्षी निसर्गमेळा आयोजित करत असते. यावर्षी निसर्गमेळा-२०१९ "सर्पगंधा" या नामशेष होत असलेल्या वनस्पतीला समर्पित केला होता.
पर्यावरण दक्षता मंडळ, श्रीरंग एजुकेशन सोसायटी, आणि लायन्स क्लब ऑफ ठाणे नॉर्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "निसर्गमेळा " आज सकाळी श्रीरंग विद्यालय ठाणे येथे पार पडला. या कार्यक्रमाची सुरवात कुमार जयवंत यांनी "निसर्ग वाचवा " असा संदेश देणाऱ्या एका सुंदर अशा कवितेने केली. त्यानंतर व्यासपीठावर मान्यवरांचे आगमन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी विद्याधर वालावलकर (अध्यक्ष, पर्यावरण दक्षता मंडळ ), सीमा जोशी (सचिव , पर्यावरण दक्षता मंडळ ) , मिलिंद बल्लाळ (कार्याध्यक्ष, श्रीरंग एजुकेशन सोसायटी) , प्रमोद सावंत ( सचिव,श्रीरंग एजुकेशन सोसायटी), नयना तारे (लायन्स क्लब ऑफ ठाणे नॉर्थ, पर्यावरण विभाग), गौरांग पटेल (अध्यक्ष लायन्स क्लब ऑफ ठाणे नॉर्थ) आणि हर्षदा केटी (कार्याध्यक्ष, लायन्स क्लब ऑफ ठाणे नॉर्थ) उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा घागरे यांनी यशस्वीरीत्या पार पाडले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्याधर वालावलकर यांनी केले यामध्ये त्यांनी वन्यजीव सप्ताहाचे महत्व , ठाणे परिसरात असलेल्या जंगल परिसंस्थेविषयी माहिती दिली तसेच या निमित्त भरवलेल्या निसर्गमेळ्याचे महत्व विशद केले. यानंतर मिलिंद बल्लाळ (कार्याध्यक्ष, श्रीरंग एजुकेशन सोसायटी) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच पर्यावरण दक्षता मंडळ यासंस्थेच्या वीस वर्षांच्या यशस्वी वाटचालीचे कौतुक केले तसेच लायन्स क्लब यांनी दिलेल्या मदतीच्या हातामुळे हे कार्य पूर्ण होऊ शकले म्हणून त्यांचेही यानिमित्ताने आभार मानले. त्यानंतर नयना तारे (लायन्स क्लब ऑफ ठाणे नॉर्थ, पर्यावरण विभाग) यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि पर्यावरण दक्षता मंडळाच्या निसर्गमेळा या उपक्रमाच्या व्यवस्थापनाचीही प्रशंसा केली. यानिमित्ताने "आपलं पर्यावरण या द्विभाषिक मासिकाचे प्रकाशन करण्यात आले.
निसर्गमेळा २०१९ या उपक्रमात पथनाट्य, चित्रकला, टाकाऊपासून टिकाऊ , विज्ञान प्रतिकृती, मुखवटा , पर्यावरणीय गीत, पक्षीपुस्तिका, प्रश्नमंजुषा, भेटकार्ड, खजिना शोध, झाडे ओळख, निसर्ग छायाचित्र स्पर्धा अशा एकूण १३ वैविध्यपूर्ण स्पर्धा तसेच सहभागी विद्यार्थ्यांसाठी हा खेळ सावल्यांचा, जादूचे प्रयोग आणि कुंभारकाम अशा पर्यावरण शिक्षणाच्या कृतिशील उपक्रमांचा समावेश होता. निसर्गमेळा २०१९ या उपक्रमामध्ये ठाणे आणि कळवा येथील ४० शाळांच्या एकूण ५०० विद्यार्थ्यांनी आपला सहभाग दर्शवला. या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण आज दुपारी १२ वाजता श्रीरंग विद्यालय येथे संपन्न झाले. शेवटी सामुहीक राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली..