बदलापूर: बदलापुरातील दोन चिमुकलींच्या अत्याचार प्रकरणामुळे संपूर्ण देश हा हादरलेला असताना आता केंद्र सरकारने याप्रकरणी चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. या आयोगाच्या अधिकाऱ्यांनी आज तब्बल पाच तास तपास यंत्रणेची आणि शाळा प्रशासनाची चांगलीच 'शाळा' घेतली.
राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या सदस्य सचिव रुपाली बॅनर्जी सिंग या बदलापूरमध्ये दाखल झाल्या आहेत. त्यांनी आज बदलापूर पालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीतील सभागृहात चौकशीच्या अनुषंगाने सर्व विभागांना एकत्रित केले होते. सुरुवातीला या घटनेच्या अनुषंगाने पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन नेमके पोलिसांनी कोणती भूमिका बजावली याबाबतचा आढावा घेतला. त्यानंतर पोलीस कोणत्या दिशेने तपास करीत आहेत याची माहिती घेतली. पोलिसा नंतर शहरातील इतर विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत देखील त्यांनी चर्चा केली. ज्या शाळेत हा प्रकार घडला त्या शाळेच्या मुख्याध्यापिका, वर्ग शिक्षिका आणि मदतीस यांच्याकडून देखील घडलेल्या प्रकाराबाबतची माहिती घेतली. आणि नेमकी चूक कुठे झाली याचा आढावा घेतला.
मुलीची वैद्यकीय तपासणी करणाऱ्या वैद्यकीय पथकासोबत देखील त्यांनी सविस्तर चर्चा केली. नेमकी त्या मुलीची परिस्थिती काय आहे आणि काय होती, याबाबत त्यांनी सविस्तर नोंद करून घेतली. यावेळी संस्थाचालकांसोबत देखील त्या घडलेल्या प्रकाराची माहिती घेणार होते. मात्र संस्थाचालकांवर गुन्हा दाखल झाल्याचे कळतात सर्व संस्था चालकांनी तिथून पळ काढला. त्यामुळे बॅनर्जी यांना या संस्थाचालकांकडून कोणतीही माहिती मिळाली नाही.